पदाधिकारी तेच राहतील, बदलण्याचा प्रश्न नाही

By Admin | Updated: July 7, 2014 00:45 IST2014-07-07T00:45:40+5:302014-07-07T00:45:40+5:30

काँग्रेस जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांचे धोरण

The office bearers remain the same, there is no question of change | पदाधिकारी तेच राहतील, बदलण्याचा प्रश्न नाही

पदाधिकारी तेच राहतील, बदलण्याचा प्रश्न नाही


सोलापूर:विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सध्या अस्तित्वात असलेली कार्यकारिणी आणि तालुकाध्यक्ष कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी घेतला आहे़
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संतोष पाटील यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत़ पदभार घेताना दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मंगळवेढा तालुक्यातील अनेक नेते अनुपस्थित होते़ या पार्श्वभूमीवर संतोष पाटील यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत़ या भेटीतून विद्यमान पदाधिकाऱ्यांना अभय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे़
बाळासाहेब शेळके यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे़ त्यांच्या जागी संतोष पाटील यांची निवड झाली असून, अन्य पदाधिकारी पदासह कायम राहतील, अशी भूमिका पाटील यांनी घेतली आहे़ जुन्या कार्यकारिणीत सर्व तालुक्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न झाला होता़ असमतोल असल्यास गरज असेल त्या तालुक्यातील कार्यकर्त्यांचा नव्या कार्यकारिणीत समावेश करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले़
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व तालुकाध्यक्षांना सक्रिय करण्यात येईल, तत्पूर्वी त्यांना पदावर कायम ठेवण्याचा आणि पक्षाच्या वाढीसाठी मरगळ झटकून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे़
विद्यमान तालुकाध्यक्षांना हटवण्यासाठी आलेल्या राजकीय दबावाला बळी पडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले़
---------------------------------
बार्शी, सांगोल्यात पोकळी
बार्शी आणि सांगोला तालुक्यातील नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे़ त्यामुळे दोन्ही तालुक्यात पोकळी निर्माण झाली आहे़ आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी म्हणून दोन्ही तालुक्यात नव्याने संघटना बांधणीचे काम हाती घेणार आहे, असे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी सांगितले़

Web Title: The office bearers remain the same, there is no question of change