नाथ महाराज पालखीतील वारकऱ्यांचा ठिय्या

By Admin | Updated: July 8, 2014 01:08 IST2014-07-08T01:08:20+5:302014-07-08T01:08:20+5:30

पालखी मार्गासाठी आंदोलन; प्रशासनाच्या तोडग्याने पालखी पुढे मार्गस्थ

Nath Maharaj Stalks of Warakaris in Palakkhi | नाथ महाराज पालखीतील वारकऱ्यांचा ठिय्या

नाथ महाराज पालखीतील वारकऱ्यांचा ठिय्या

पंढरपूर: नाथ महाराज पालखी सोहळ्यातील हजारो वारकरी भक्तांनी व्होळे-कौठाळी येथील नदीवर पूल बांधावा यासाठी कौठाळी-व्होळे नदीकडेवर पाच तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, प्रशासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन तशी हमी दिल्याने पंढरपूरच्या वास्तव्यासाठी पालखी मार्गस्थ झाली.
जोपर्यंत शासन पैठण ते पंढरपूर मार्गावरील कौठाळी ते व्होळे येथे पूल बांधण्यासाठी आश्वासन देत नाही, तोपर्यंत पालखी सोहळा हलविला जाणार नसल्याचा पवित्रा नाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. रघुनाथ महाराज यांनी घेतला.
हजारो वारकरी भक्तांनी केलेल्या आंदोलनास कौठाळी-व्होळे येथील ग्रामस्थांनी पाठिंबा देऊन आंदोलनामध्ये सहभागी झाले. यावेळी वारकऱ्यांनी व्होळे-कौठाळी मार्गावर पूल झालाच पाहिजे अशा घोषणा देऊन वातावरण दणाणून सोडले.
वेळोवेळी लेखी निवेदन देऊनही शासनाने याची दखल घेतली नाही. पुढील वर्षी आषाढी वारीपूर्वी पुलाचे बांधकाम न झाल्यास पैठण येथूनच नाथ महाराज पालखीचे प्रस्थान करणार नसल्याचे पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. रघुनाथ महाराज यांनी सांगितले. तसेच साडे येथून निघणारी संत बलभीम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. वामन महाराज शिरसाठ यांनीही पूल बांधण्याची मागणी केली.
--------------------------
आषाढी वारीदिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करून कौठाळी-व्होळे मार्गावरील पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू.
- गजानन गुरव,
तहसीलदार, पंढरपूर
 

Web Title: Nath Maharaj Stalks of Warakaris in Palakkhi