Solapur Crime: सोलापुरात एका विवाहितीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळी कपडे आंघोळीनंतर बदलण्यासाठी खोलीत गेलेली विवाहित महिला अर्ध्या तासाने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने एकच खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घडली. दक्षिण सोलापुरातील विंचूरमध्ये घडलेल्या घटनेमागचे कारण मात्र समजू शकले नाही. प्रतिज्ञा सचिन बिराजदार (वय २२) असे त्या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
प्रतिज्ञा हिने सकाळी नेहमीप्रमाणे आंघोळ केली आणि कपडे बदलण्यासाठी स्वतःच्या खोलीत गेली. तिने दार लावून घेतले. अर्ध्या तासाने घराच्या गच्चीवर लहान बाळाला खेळवणारा तिचा पती सचिन बिराजदार खाली येऊन पाहतो तर दार बंद होते. सचिनने दोन-तीन वेळा ठोठावले तरी उघडले नाही. त्यामुळे त्याने भावाला बोलवले. खिडकीतून पाहिले असता प्रतिज्ञाने साडीने बेडवरील अँगलला गळफास लावल्याच्या स्थितीत दिसली. दोघांनी तातडीने दरवाजा तोडून प्रतिज्ञाला खाली उतरवले.
सरपंच बाळू पाटील यांच्या मदतीने प्रतिज्ञाला उपचारासाठी सोलापूरकडे नेण्यात येत होते. मात्र जाताना वाटेतच प्रतिज्ञाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन करून प्रतिज्ञाचा मृतदेह नातलगाच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिन बिराजदार याने घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पीएसआय चव्हाण आणि हवालदार मुलानी तपास करीत आहेत.
बुधवारी संध्याकाळी प्रतिज्ञाने सांगली येथील तिच्या आईला आणि काकांना फोन केला होता. यावेळी तिने मी मजेत आहे असं सांगितले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी अचानक ही घटना घडल्याने माहेर आणि सासरची मंडळी बुचकळ्यात पडली आहे. प्रतिज्ञाने आत्महत्या का केली याचे उत्तर कोणाकडेच नव्हते. वडील ड्रायव्हिंगसाठी बाहेरच्या राज्यात गेल्याने अंत्यविधीस उपस्थित राहू शकले नाहीत.
प्रतिज्ञाचे माहेर हे सांगली होते. अकरावीपर्यंत तिचे शिक्षण झालेलं होतं. १२ वी करून नर्स होण्याचे तिचे स्वप्न होते. तशी तिची तयारी देखील सुरू होती. पती सचिन शेती करत होता त्याचे शिक्षणही बेताचेच होते. तिच्या शिक्षणाला कोणाचा विरोध नव्हता तरीही तिने आत्महत्या का केली असा प्रश्न विचारला जात आहे. पोलिस घटनेमागच्या कारणांचा शोध घेत आहेत.