Balasaheb Sarwade Case : मनसेच्या बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील चार आरोपींना पकडले; तासवडे टोलनाक्यावर पोलिसांची सापळा रचून कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:35 IST2026-01-05T12:17:55+5:302026-01-05T12:35:27+5:30
Balasaheb Sarwade Case : सोलापुरातील मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Balasaheb Sarwade Case : मनसेच्या बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील चार आरोपींना पकडले; तासवडे टोलनाक्यावर पोलिसांची सापळा रचून कारवाई
Balasaheb Sarwade Case : सोलापुरातील मनसे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी आज तासवडे टोल नाक्यावर पकडले. तळबीड पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या आरोपींना पुढील तपासासाठी सोलापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
राज्यात महानगर पालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरवदे यांची हत्या झाली. निवडणुकीत उमेदवारीच्या वादातून मनसे विद्यार्थीसेनेचा शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदेंची हत्या झाली होती. या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली होती. या खून प्रकरणातील शंकर शिंदे, सुनील शिंदे, आलोक शिंदे आणि महेश भोसले,हे चार संशयित फरार झाले होते. दरम्यान, आज (सोमवार) सकाळी तळबीड पोलिसांनी कारवाई केली.
मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली
अर्ज माघारी घेण्याच्या वादातून सोलापूरात मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे सोलापूर शहरात खळबळ माजली. या सरवदे कुटुंबाची आज मनसे नेते अमित ठाकरे यांनी भेट घेतली.
अमित ठाकरे यांनी सोलापूरात बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाला भेट देत सांत्वन केले. मात्र याठिकाणी बाळासाहेब यांच्या लहान चिमुकल्यांचा आक्रोश पाहून अमित ठाकरेही गहिवरले. बाळासाहेब सरवदे यांची लहान मुलगी ढसाढसा रडत होती. माझे पप्पा मला सोडून गेले असं म्हणत ती आर्त हाक देत होती. हे दृश्य पाहून कुणाचेही मन हेलावेल. अमित ठाकरे यांच्यासमोर हात जोडून ही चिमुकली वडिलांच्या आठवणीने अक्षरश: कोलमडून पडली. अमित ठाकरे तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होते मात्र या क्षणांनी तेदेखील निःशब्द झाले. या घटनेचा व्हिडिओ तिथे काहीजण कॅमेऱ्यात कैद करत होते. मात्र ही बाब अमित ठाकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ सर्व रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तींना घराच्या बाहेर पाठवले. परंतु आता यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून कुणाचेही डोळे पाणावतील.
अमित ठाकरे संतापले
बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाची सांत्वन भेट घेतल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी संतप्त भूमिका मांडली. राजकारणाची पातळी इतक्या खालच्या थराला गेली आहे. पैशाचे आमिष दाखवून अर्ज मागे घेण्यापर्यंत ठीक होते परंतु आता लोकांचा खून करेपर्यंत मजल गेली, ते फक्त निवडणुकांसाठी..मी इथे आलोय तसं देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी येथे येऊन इथली परिस्थिती काय आहे ते पाहिले पाहिजे. अशा निवडणुका असतील तर आम्हाला निवडणुका नको, आम्ही सगळे अर्ज परत घेतो. तुम्ही जिंका. ती मुलगी रडत होती. अशी परिस्थिती महाराष्ट्रातली तुम्ही आणून ठेवली असं त्यांनी म्हटलं.