५ टक्के दंड आकारून सोलापूर शहरातील २३ कामांना मुदतवाढ, महापालिका प्रशासनाची माहिती

By Appasaheb.patil | Published: December 28, 2022 04:58 PM2022-12-28T16:58:07+5:302022-12-28T16:59:45+5:30

सोलापूर शहरात सध्या रस्ते, ड्रेनेज, पाइपलाइन यासह अन्य विविध कामे सुरू आहेत. या कामांची वर्कऑर्डर दिली असून, कामे सध्या वेगाने सुरू आहेत.

Extension of time for 23 works in Solapur city by levying 5 percent penalty, information of municipal administration | ५ टक्के दंड आकारून सोलापूर शहरातील २३ कामांना मुदतवाढ, महापालिका प्रशासनाची माहिती

५ टक्के दंड आकारून सोलापूर शहरातील २३ कामांना मुदतवाढ, महापालिका प्रशासनाची माहिती

Next

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या २२ कामांना ५ टक्के दंड आकारून मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, यापुढे वादग्रस्त कामांचे टेंडरच न काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयुक्त शीतल तेली-उगले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सोलापूर शहरात सध्या रस्ते, ड्रेनेज, पाइपलाइन यासह अन्य विविध कामे सुरू आहेत. या कामांची वर्कऑर्डर दिली असून, कामे सध्या वेगाने सुरू आहेत. मात्र, १५ डिसेंबर २०२२ पूर्वी ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. तसा वर्कऑर्डरमध्ये उल्लेखदेखील आहे. मात्र, बरीच कामे प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे. 

शिवाय संबंधित कामांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रशासनाकडे संबंधित ठेकेदारांकडून प्राप्त झाला होता. त्यावर निर्णय घेत महापालिकेने या २२ कामांच्या ठेकेदारांना ५ टक्के दंड आकारून मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. बऱ्याच कामांचे टेंडर निघते, वर्कऑर्डर दिली जाते, पुन्हा कळते की त्या जागेचा वाद सुरू आहे. त्यामुळे वेळेत काम पूर्ण होत नाही, परिणामी ठेकेदारांकडून मुदतवाढ मागितली जाते. शिवाय ते काम प्रलंबित राहते, त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होतो. नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महापालिका आता कडक धोरण अमलात आणत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

कालावधी संपण्यापूर्वी मुदतवाढीचा प्रस्ताव हवा...
ज्या कामांची वर्कऑर्डर देण्यात आली आहे त्या कामांचा कालावधी संपण्यापूर्वी एक महिना अगोदर कामाला मुदतवाढ देण्याच्या मागणीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे प्राप्त होणे आवश्यक आहे. मात्र, अनेक ठेकेदारांकडून तसे होताना दिसत नाही, त्यामुळे आयुक्तांनी ठेकेदारांनाही कालावधी संपण्यापूर्वीच मुदतवाढीचा प्रस्ताव देणे आवश्यक असल्याचे बजावून सांगितले.

नागरिकांच्या भल्यासाठीच हा निर्णय
कोर्टाचा स्टे, वादग्रस्त, जागा उपलब्ध नसणे यासह अन्य कारणांमुळे कामे होत नसतील तर त्या कामांचे टेंडरच काढू नये असेही आयुक्तांनी संबंधित विभागाला सुचविले आहे. कामे लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. सोलापूर शहरात गेल्या काही वर्षापासून पावसाळा व इतर कारणास्तव अंतर्गत रस्ते व इतर कामे रखडली होती. या कामाची मुदत संपत आली होती. ही कामे मार्गी लावावी यासाठी अशा कामांना मुदतवाढ देण्याचा अखेर निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

शहरातील रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात
भांडवली निधीतून शहरात १७ रस्ते नव्याने होत आहेत. सद्य:स्थितीला १२ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याची माहिती सांगण्यात आली. आयुक्तांनी रस्ते या विषयाकडे जास्त लक्ष दिल्याने मक्तेदारांकडून रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्यात येत आहेत. उर्वरित कामे डिसेंबरअखेर पूर्ण होतील असे नगर अभियंता कार्यालयाकडून सांगण्यात आले.
 

Web Title: Extension of time for 23 works in Solapur city by levying 5 percent penalty, information of municipal administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.