शॉर्टकट दर्शन देणाऱ्या पोलिसाला चोप

By Admin | Updated: July 8, 2014 01:10 IST2014-07-08T01:10:41+5:302014-07-08T01:10:41+5:30

रांगेत घुसखोरीचा प्रयत्न : वारकऱ्यांमध्ये संताप

Chopped Polisala showing the shortcut | शॉर्टकट दर्शन देणाऱ्या पोलिसाला चोप

शॉर्टकट दर्शन देणाऱ्या पोलिसाला चोप


पंढरपूर : विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ निराळी असते. काही भाविक दिवसभर दर्शन रांगेत थांबून दर्शन घेतात तर काही शॉर्टकट मार्ग शोधतात, परंतु कधी कधी हा मार्ग महागात पडतो, याची प्रचिती रविवारी चक्क पोलीस कर्मचाऱ्याला आली. दर्शन रांगेत स्वत:चे नातेवाईक घुसवण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस व मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी तर झालीच. याचे रूपांतर मारामारीतही झाले.
आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पंढरीत येत असतात. प्रत्येक भाविकाला विठ्ठल-रूक्मिणीेचे दर्शन घेण्याची ओढ असते. यामुळे भाविक ७ ते ८ कि. मी. अंतरावरील दर्शन रांगेत थांबतात. या दर्शन रांगेत भाविकांना आषाढी यात्रेत १२ ते १८ तास थांबावे लागते. अंधारात रात्रंदिवस काढून अनेक अडीअडचणीतून विठ्ठलाचे दर्शन घेतात. काही वृद्ध व लवकर दर्शन हवे या भाविकांसाठी विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने आॅनलाईन बुकिंग सेवा सुरू केली आहे. दर्शन रांगेत कोणी मधून घुसखोरी करू नये, यासाठी मंदिर समितीचे सुरक्षा कर्मचारी त्यांना रोखण्याचे काम करीत आहेत. त्याचबरोबर घुसखोरी होऊन मोठा वाद निर्माण होऊ नये, यासाठी दर्शन रांगेत मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
असे असतानाही पंढरपुरात आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आलेले लातूर जिल्ह्यातील लिंबाजी जानकर यांनी रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घरातील सदस्यांना दर्शन मंडपातून रांगेमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी रांगेत कोणी घुसखोरी करु नये, यासाठी थांबलेल्या मंदिर समितीच्या सुरक्षा कर्मचारी अनिता देवकर व त्या पोलिसात वाद झाला. त्या दोघात एकमेकांना मारहाण झाली. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या मंदिर समितीचे कर्मचारी सत्यवान घाघरे व तुकाराम राऊत यांच्याबरोबरही त्या पोलीस कर्मचाऱ्याची शिवीगाळ झाली. यावेळी त्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करा अन्यथा मंदिर समितीचे सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन करणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली, व्यवस्थापक एस. एस. विभुते, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांनी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांची समजूत काढून हा वाद मिटविला.

Web Title: Chopped Polisala showing the shortcut