मोठी बातमी; पोलीस भरतीची जाहिरात निघाली, ३० नोव्हेंबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

By Appasaheb.patil | Published: November 7, 2022 03:43 PM2022-11-07T15:43:09+5:302022-11-07T15:43:15+5:30

सोलापूर शहर, ग्रामीण पोलीस दल; २५६ रिक्त पदे भरणार

big news; Police recruitment advertisement is out, apply online till 30th November | मोठी बातमी; पोलीस भरतीची जाहिरात निघाली, ३० नोव्हेंबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

मोठी बातमी; पोलीस भरतीची जाहिरात निघाली, ३० नोव्हेंबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पोलीस शिपाई पदाच्या रिक्त जागा लक्षात घेता, पोलीस भरतीसंदर्भातील जाहिरात रविवारी प्रसिद्ध झाली आहे. सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० या दलात पोलिसांची २५६ पदे भरण्यात येणार आहेत.

दरम्यान, रविवारी सर्व माध्यमांमध्ये सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० यांच्या कार्यालयाकडून रिक्त पदे भरण्यात येणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय कार्यालयाने निश्चित केलेल्या शारीरिक व लेखी परीक्षेच्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही.

--------

लेखी परीक्षा एकाच दिवशी...

पोलीस भरतीमधील पोलीस शिपाई व पोलीस चालक पदासाठी प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

--------

लेखी परीक्षेत ४० टक्के गुण अपेक्षित

शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १.१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेत ४० टक्के पेक्षा कमी गुण मिळणारे उमेदवार अपात्र समजण्यात येणार आहेत.

--------

तर अर्ज करू शकणार नाही

उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावयाचा आहे. रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवारांनी अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अर्ज करू शकतात; परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करू शकणार नाहीत, असेही जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

-----------

एवढ्या आहेत रिक्त जागा

  • सोलापूर शहर - चालक - ७३, पोलीस शिपाई - ९८
  • सोलापूर ग्रामीण - चालक - २८, पोलीस शिपाई - २६
  • राज्य राखीव पोलीस बल - ३३

----------

सविस्तर माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या

पोलीस शिपाई, चालक पोलीस व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० च्या कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या रिक्त जागेसंदर्भातील सविस्तर माहिती, अटी, नियम व अन्य माहितीसाठी policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळाला भेट द्यावी व अर्ज सादर करण्याबाबतची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

-------

अशी जाहीर होईल अंतिम गुणवत्ता यादी...

शारीरीक चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्तेनुसार तात्पुरती निवडसूची करण्यात येईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्रे पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल. शारीरिक चाचणी व लेखी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर गृह विभागाच्या वतीने अंतिम गुणवत्ता यादीत तयार करण्यात येणार आहे.

Web Title: big news; Police recruitment advertisement is out, apply online till 30th November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.