बार्शी पोलिसांची मोठी कारवाई; एम.डी. ड्रग्स, पिस्तुल, जिवंत काडतुसे, मोबाईल, कार जप्त
By आप्पासाहेब पाटील | Updated: April 18, 2025 13:50 IST2025-04-18T13:48:40+5:302025-04-18T13:50:00+5:30
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी बार्शी शहरात मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

बार्शी पोलिसांची मोठी कारवाई; एम.डी. ड्रग्स, पिस्तुल, जिवंत काडतुसे, मोबाईल, कार जप्त
सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी बार्शी शहरात मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. एम.डी. ड्रग्स, पिस्तुल, जिवंत काडतुसे, मोबाईल, कार असा १३ लाखांचा मुद्देमाल बार्शी पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना पाेलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती शुक्रवारी सकाळी बार्शी पोलिसांनी दिली.
याबाबत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बार्शी- परांडा रोडवरील एका हॉटेलसमोर बार्शी शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत १३ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये मॅफेड्रॉन (एम.डी.) १२ लाख, गावठी पिस्तूल ५० हजार, २ जिवंत काडतुसे ५ हजार, तीन मोबाईल २५ हजार आणि आल्टिस कार १ लाख ८ हजार ५०० रुपयांचा समावेश आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी एन.डी.पी.एस. अॅक्ट, शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नाकुल व पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकाने केली.