Video: शाळेच्या शेवटच्या दिवशी मॅडमकडून लय भारी गिफ्ट, भावूक झाले विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 16:25 IST2023-06-30T16:16:49+5:302023-06-30T16:25:24+5:30
शाळेतील शेवटच्या दिवशी शिक्षिकेनेच विद्यार्थ्यांना अनोखे गिफ्ट दिलंय. त्यामुळे, विद्यार्थीही भावूक झाले आहेत.

Video: शाळेच्या शेवटच्या दिवशी मॅडमकडून लय भारी गिफ्ट, भावूक झाले विद्यार्थी
शाळा असो की कॉलेज शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्यात एक भावनिक बंध निर्माण झालेले असतात. म्हणूनच, कॉलेजच्या फेअरवेल समारंभात अनेकांना अश्रू येतात. तर, शाळेतून एखाद्या शिक्षकाची बदली झाल्यास चिमुकल्या शाळकरी मुलांना रडू कोसळल्याचं आपण पाहतो. सोशल मीडियातून अशा घटनांचे व्हिडिओही व्हायरल झाल्याचं आपण पाहिलं आहे. आता, आणखी एक व्हिडिओ असाच समोर आला असून शाळेतील शेवटच्या दिवशी शिक्षिकेनेच विद्यार्थ्यांना अनोखे गिफ्ट दिलंय. त्यामुळे, विद्यार्थीही भावूक झाले आहेत.
Heather Stansberry नावाच्या इंस्टाग्राम अकॉउंटवरुन या शिक्षिकेनं एक व्हिडिओ शेअर केला असून नेटीझन्सच्या पसंतीस पडला आहे. शिक्षिका हीथरच्या या कमालीच्या गिफ्टचे नेटीझन्सनेही कौतुक केलंय. हीथर या शाळेतील आपल्या शेवटच्या दिवशी वर्गात ओव्हरकोट परिधान करुन आल्या होत्या. मॅडमला या पोशाखात पाहून शिक्षकही आश्चर्यचकित झाले. मात्र, मॅडमने ओव्हरकोट काढताच त्यांनी परिधान केलेल्या ड्रेस पाहून विद्यार्थ्यांना आनंद झाला, ते भावूक झाले. कारण, मॅडम हीथरने परिधान केलेल्या पांढऱ्या ड्रेसवर त्यांच्या विद्यार्थ्यांनी रंगबेरंगी चित्रे काढलेली, नाव काढलेली, रंगवलेली निशाणी दिसत होती.
दरम्यान, काही तासांपूर्वी शिक्षिका हीथर यांनीच आपला हा ड्रेस विद्यार्थ्यांकडे दिला होता. तसेच, या ड्रेसवर तुम्हाला जे वाटतं ते डिझाईन किंवा चित्र काढण्याचे सूचवले होते. विद्यार्थ्यांनीही हीथरच्या या ड्रेसवर वेगवेगळे डिझाईन केले होते. त्यामुळेच, मॅडम हीथर यांच्या अंगावरील हा ड्रेस पाहून विद्यार्थीही भावूक झाले होते. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून लहानग्या विद्यार्थ्यांना हटके गिफ्ट देणाऱ्या मॅडम हीथरचं नेटीझन्स कौतुक करत आहेत.