“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:35 IST2026-01-14T14:35:01+5:302026-01-14T14:35:27+5:30
Sleeper Vande Bharat Express Train: पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत प्रवाशांमध्ये कमालीची उत्सुकता असून, भारतीय रेल्वेच्या एका अधिकाऱ्याची पोस्ट चर्चेत आली आहे.

“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
Sleeper Vande Bharat Express Train: १७ जानेवारी २०२६ हा दिवस भारतीय रेल्वेसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. चेअर कार स्वरुपातील वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन लोकप्रियतेच्या शिखरावर असताना भारतीय रेल्वे आता स्लीपर वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठी सज्ज झाली आहे. पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत प्रवाशांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अशातच रेल्वेच्या एका अधिकाऱ्याची एक्सवरील पोस्ट चर्चेत आली आहे.
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज
काही दिवसांपूर्वी स्लीपर वंदे भारत ट्रेन प्रत्यक्ष प्रवाशांच्या सेवेत कधी येईल, याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली होती. दोन प्रोटोटाइप रेक, अनेक महिन्यांची ट्रायल, या दरम्यान आलेल्या अडचणी, निरीक्षणांनंतर केलेले महत्त्वाचे बदल असे अनेक टप्पे पार करत अखेरीस वंदे भारत ट्रेन स्लीपर व्हर्जन भारतीय रुळांवर धावताना दिसणार आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात सामान्य प्रवाशांसाठी आतापर्यंत देण्यात आल्या नाहीत, अशा अनेक सोयी, सुविधा स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये पाहायला, अनुभवायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कमाल! पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे टाइमटेबल आले; कधी सुटणार, किती थांबे असणार? पाहाच
रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत, नेमके काय म्हणतायेत?
रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या लोकार्पणाआधी एक्सवर एक पोस्ट केली आहे. “कृपया जर तुम्ही ‘टॉयलेट मॅनर्स’ शिकलेले असाल, तसेच वॉशरूमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणार असाल, आणि तुम्हाला सार्वजनिक मालमत्तेबाबत आदर असेल तरच या ट्रेनने प्रवास करा. धन्यवाद!” अशी पोस्ट करण्यात आली आहे. त्यांची ही पोस्ट ८५ हजांरहून अधिक लोकांना पाहिली असून, यामुळे रेल्वेमधील स्वच्छतेचा स्तर आणि ठेवली जाणारी देखरेख याबाबत लोक भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
युझरचे भाष्य आणि रेल्वे अधिकाऱ्यांचा रिप्लाय
अशी आशा आहे की फ्लश नीट काम करेल, पाणी भरलेले असेल, टिश्यू ठेवलेले असतील. कृपया त्यानंतरच लोकांना याबद्दल शिक्षित करा, कारण बहुतेकदा २ एसी आणि ३ एसीमध्ये हे उपलब्ध नसते. योग्य देखभाल आवश्यक आहे, पुरेसे कर्मचारी असले पाहिजेत, आणि कंत्राटदारांनी लूट करू नये, असे एका युजरने त्यांच्या पोस्टवर म्हटले आहे. यावर, किमान प्रीमियर रेल्वेमध्ये तरी ही समस्या कधीच नसते. फक्त एवढी समस्या आहे की, काही पॅसेंजर फ्लश करण्याचे किंवा तो चालतोय की नाही हे पाहण्याचेही कष्ट घेत नाहीत, असा रिप्लाय अधिकाऱ्यांनी दिला. दुसरीकडे एका युजरने रेल्वे कर्मचारी कचरा रेल्वेमधून बाहेर फेकतानाचा व्हिडीओ शेअर केला. यावर अधिकाऱ्यांनी उत्तर दिले की, काही जुने निवडक व्हिडिओ पसरवल्याने पूर्ण सत्य समोर येत नाही. हो, ही एक समस्या आहे आणि ती सोडवली जात आहे. असे प्रकार करत असलेल्या व्हेंडर्सकडून मोठा दंड आकारला जात आहे.
दरम्यान, वंदे भारत स्लीपरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये RAC किंवा वेटिंग लिस्ट तिकीट असणार नाही. प्रवाशांना केवळ 'कन्फर्म' तिकीटच दिले जाईल. रेल्वेने स्लीपर वंदे भारत ट्रेनसाठी किमान ४०० किमी अंतराचे भाडे निश्चित केले आहे. या ट्रेनचे तिकीट दर अंतरावर आधारित असून GST स्वतंत्र असणार आहे. वंदे भारत स्लीपरमध्ये ४०० किमी पर्यंतच्या प्रवासासाठी, थर्ड एसीचे भाडे ₹९६०, सेकंड एसीचे भाडे ₹१२४० आणि फर्स्ट एसीचे भाडे ₹१५२० असेल. त्याचप्रमाणे, ८०० किमी पर्यंतच्या प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹१९२०, २एसीचे भाडे ₹२४८० आणि १एसीचे भाडे ₹३०४० असेल. १६०० किमीच्या प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹३८४०, २एसीचे भाडे ₹४९६० आणि १एसीचे भाडे ₹६०८० असेल. २००० किमीच्या प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹४८००, २एसीचे भाडे ₹६२०० आणि फर्स्ट एसीचे भाडे ₹७६०० असेल. त्याचप्रमाणे, २८०० किमी प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹६७२०, २एसीचे भाडे ₹८६८० आणि पहिल्या एसीचे भाडे १०६४० असेल. ३५०० किमी प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹८४००, दुसऱ्या एसीचे भाडे ₹१०८५० आणि पहिल्या एसीचे भाडे ₹१३३०० असेल.
Please travel in it only if you have learnt your toilet manners, will obey the instructions given in the washrooms, and have respect for public property. Thanks! #IndianRailways#VandeBharathttps://t.co/mnnm153clQ
— Ananth Rupanagudi (@Ananth_IRAS) January 12, 2026