दिवाळीच्या तोंडावर नोकरीवरून हाकलले; ६ महिन्यांनी त्याच कंपनीने डेटासाठी फोन केला अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 13:44 IST2026-05-16T13:41:26+5:302026-05-16T13:44:06+5:30
दिवाळीच्या दोन दिवस आधी कंपनीने कर्मचाऱ्याला अचानक नोकरीवरून काढून टाकले. पण ६ महिन्यांनी जेव्हा डेटा सांभाळता आला नाही, तेव्हा त्याच कंपनीने फोन केला.

AI Generated Image
कॉर्पोरेट जगतातील ले-ऑफ आणि कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू असते. बऱ्याचदा कंपन्या खर्चात कपात करण्यासाठी आपल्या जुन्या आणि अनुभवी कर्मचाऱ्यांना एका झटक्यात बाहेरचा रस्ता दाखवतात. पण, कर्मचाऱ्याला काढताना स्वतःला शहाणे समजणाऱ्या कंपन्यांना नंतर कशा अडचणी येतात, याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'रेडिट'वर एका कर्मचाऱ्याने शेअर केलेली पोस्ट सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. दिवाळीच्या अवघ्या दोन दिवस आधी ज्या कंपनीने या कर्मचाऱ्याला लाथ मारून काढले होते, त्याच कंपनीला ६ महिन्यांत गुडघ्यावर यावे लागले आहे.
त्या कर्मचाऱ्याने पोस्टमध्ये लिहिले, "आज ६ महिन्यांनी मला माझ्या जुन्या कंपनीतून डेटाबद्दल विचारण्यासाठी फोन आला... मी फक्त जोरात हसलो आणि फोन ठेवून दिला!"
दिवाळीच्या दोन दिवस आधी धक्का, मानसिक खच्चीकरण
संबंधित कर्मचाऱ्याने आपल्या पोस्टमध्ये त्याचा वेदनादायी अनुभव सांगितला आहे. तो बऱ्याच काळापासून त्या कंपनीत काम करत होता आणि अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत होता. सर्व काही सुरळीत सुरू असताना, अचानक दिवाळीच्या अवघ्या दोन दिवस आधी कंपनीने त्याला बोलावले आणि "आता कंपनीला तुझी गरज नाही, उद्यापासून कामावर येऊ नको," असे सांगून कामावरून काढून टाकले. सणासुदीच्या काळात कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक नोकरी गेल्यामुळे या कर्मचाऱ्याचे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण झाले होते. कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत असलेल्या या तरुणाला मोठा धक्का बसला होता.
अन् ६ महिन्यांनी फिरले चक्र; कंपनीचे अज्ञान आले समोर!
नोकरी गेल्यानंतर या कर्मचाऱ्याने स्वतःला सावरले आणि काही दिवसांतच त्याला दुसऱ्या एका चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली. दरम्यान, जुन्या कंपनीत ज्या व्यक्तीला या कर्मचाऱ्याचे काम सोपवण्यात आले होते, त्याला तिथला डेटा आणि सिस्टीम हाताळणे जमलेच नाही. या कर्मचाऱ्याकडे कंपनीच्या संपूर्ण डेटाबेसची महत्त्वाची माहिती होती, जी इतर कोणालाही माहित नव्हती. अनुभवी कर्मचाऱ्याला काढल्यामुळे कंपनीचे अतोनात नुकसान होऊ लागले आणि अखेर ६ महिन्यांनी कंपनीच्या मॅनेजमेंटला आपली चूक उमगली. त्यांनी पुन्हा या जुन्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधून डेटा समजून घेण्याची आणि त्याला परत कामावर बोलावण्याची विनंती सुरू केली.
नेटीझन्स संतापले, 'टॉक्सिक वर्क कल्चर'वर कडाडून टीका
हा अनुभव सोशल मीडियावर येताच लोकांनी संबंधित कंपनीवर प्रचंड टीका केली आहे. अनेक युजर्सनी याला 'टॉक्सिक वर्क कल्चर'चे उत्तम उदाहरण म्हटले आहे. "कंपन्या कर्मचाऱ्यांना केवळ एक साधन समजतात, माणूस नाही. पण जेव्हा महत्त्वाचा माणूस जातो, तेव्हाच त्यांना त्याची किंमत कळते," अशी कमेंट एका युझरने केली आहे. तर दुसऱ्या एका युझरने लिहिले की, "ज्या कंपनीने सणाच्या तोंडावर एका कुटुंबाचा विचार केला नाही, त्यांना अशीच अद्दल घडायला हवी होती. कर्मचाऱ्याने त्यांना मदत नाकारून अगदी योग्य केले." या घटनेने पुन्हा एकदा कॉर्पोरेट जगतातील मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.