उद्धवसेनेचे मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन, दुधाचा अभिषेक, रांगोळी काढून निषेध; ९० जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:07 IST2025-08-14T16:06:24+5:302025-08-14T16:07:06+5:30

‎वैभव नाईक यांच्यासह पदाधिकारी ताब्यात; गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या दुरुस्तीची मागणी

Uddhav Sena blocks Mumbai Goa highway, 90 people booked for crimes | उद्धवसेनेचे मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन, दुधाचा अभिषेक, रांगोळी काढून निषेध; ९० जणांवर गुन्हा

उद्धवसेनेचे मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन, दुधाचा अभिषेक, रांगोळी काढून निषेध; ९० जणांवर गुन्हा

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे व खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांविरोधात आणि गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी बुधवारी माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली उद्धवसेनेने हुमरमळा येथे ‘चक्काजाम’ आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्या वैभव नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

सकाळी ११ वाजता हुमरमळा येथील पुष्पसेन सावंत महाविद्यालयासमोर राणे स्टॉप येथे उद्धवसेनेचे मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले होते. येथे उभारलेल्या व्यासपीठावर पदाधिकाऱ्यांनी महामार्गाच्या कामातील विलंबामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोईवर आवाज उठवला.

माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, बाबुराव धुरी, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, माजी उपसभापती जयभारत पालव, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, सुशील चिंदरकर यांच्यासह अनेक जण आंदोलनात सहभागी झाले होते.

सरकारकडून दिशाभूल

माजी आमदार वैभव नाईक यांनी शासन आणि लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका करत म्हटले की, महामार्गाचे काम ९८ टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला जातो. परंतु, अनेक उड्डाणपूल आणि पुलांची कामे अजूनही बाकी आहेत. त्यामुळे सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. त्यांनी महामार्ग त्वरित दुरुस्त न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.

दुधाचा अभिषेक, रांगोळी काढून निषेध

आंदोलानादरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी महामार्गावर ठाण मांडले. यावेळी कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी महामार्गाच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ दुधाचा अभिषेक केला. महिला कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध करत रांगोळी काढली. महामार्ग अधिकाऱ्यांनी २५ ऑगस्टपूर्वी आवश्यक दुरुस्ती करण्याची ग्वाही दिल्यानंतर पोलिसांनी वैभव नाईक यांच्यासह सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले.

सुमारे ९० जणांवर गुन्हा दाखल

हुमरमाळा येथे महामार्ग अडविल्याप्रकणी उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह सुमारे ९० जणांवर सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Uddhav Sena blocks Mumbai Goa highway, 90 people booked for crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.