Sindhudurg Crime: भरदिवसा घरात घुसून चोरीचा प्रयत्न, फरार टोळीतील तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:01 IST2025-12-06T15:59:26+5:302025-12-06T16:01:30+5:30
आरडाओरड केल्यानंतर चोरटे दागिने टाकून पसार झाले होते, अवघ्या पाच दिवसांत लावला छडा

Sindhudurg Crime: भरदिवसा घरात घुसून चोरीचा प्रयत्न, फरार टोळीतील तिघांना अटक
कणकवली : फोंडाघाट, गांगोवाडी येथे सकाळच्या सुमारास घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या त्या टोळीला अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शोध मोहीम राबवत भिवंडी, ठाणे, नेरूळ आदी भागांतून अटक केली. तिघा संशयित आरोपींना घेऊन पथक आज, शनिवारी कणकवली पोलिस ठाण्यात दाखल झाले. जगदीश श्रीराम यादव (वय २५, भिवंडी), चनाप्पा साईबान्ना कांबळे (५०, वागळे इस्टेट,ठाणे), नागेश हनुमंत माने (४८, नेरूळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
फोंडाघाट येथे ३० नोव्हेंबरला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना घडली होती. तृप्ती लिंग्रस व त्यांची आई या दोघी घरी होत्या. तर तृप्ती यांचे भाऊ मॉर्निंग वॉकला गेले होते. याच दरम्यान तीन आरोपी जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसले. त्यांनी तृप्ती व तिच्या आईच्या अंगावरील दागिने पळवण्याचा प्रयत्न केला. दोघींनीही आरडाओरड केल्यानंतर चोरटे दागिने टाकून पसार झाले होते.
याबाबत कणकवली पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तपास करीत होते. संशयितांचा ठावठिकाणा मिळताच पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले होते. अखेर तिन्ही संशयितांना सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती तसेच गुप्त खबऱ्यांच्या माहितीवरून शोधून काढले. तपासात आणखीन काही चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता आहे.
अवघ्या पाच दिवसांत लावला छडा
आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कार सुद्धा जप्त केली. अवघ्या पाच दिवसांत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार आशिष गंगावणे, कांडर यांनी ही कारवाई केली आहे.