‘त्या’ शिकारीचे पुरावे नाहीत

By Admin | Updated: January 29, 2015 23:38 IST2015-01-29T21:54:27+5:302015-01-29T23:38:13+5:30

मळेवाड येथील प्रकरण : ‘लोकमत’च्या वृत्ताने शिकाऱ्यांचे धाबे दणाणले

'Those' are not proof of hunter | ‘त्या’ शिकारीचे पुरावे नाहीत

‘त्या’ शिकारीचे पुरावे नाहीत

मळेवाड : मळेवाड हळदीचे भोम येथे वन्यप्राण्यांची शिकार या वृत्ताने जाग आलेल्या वनविभागाने दोन दिवस येथील जंगल परिसर अक्षरश: पिंजून काढला. मात्र, प्राण्यांच्या केसाव्यतिरिक्त त्यांना आणखी कोणताही पुरावा सापडलेला नाही.
वन्यप्राण्यांची शिकार करुन त्यांच्या मांसाची तस्करी केली जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर इतके दिवस निद्रावस्थेत असलेल्या वनविभागालाही जाग आली. शिकारी होत असल्याच्या वृत्तामुळेच आजगाव वनपाल सी. व्ही. धुरी, वनरक्षक कुमार खराडे, वनमजूर चंद्रकांत तावडे आदींनी हळदीचे भोम या परिसरात काही पुरावे सापडतात का, याचा शोध घेण्यासाठी हा जंगलमय परिसर पुर्णपणे पिंजून काढला. मात्र, काही ठिकाणी वन्य प्राण्यांचे केस पडलेले मिळाले. त्याव्यतिरिक्त काहीही हाती लागले नाही. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर शिकाऱ्यांनीच वन अधिकारी पोहोचण्याच्या आधी उरलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट लावली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जंगलात शिकारीसाठी फिरणारे हे सराईत शिकारी आहेत. मात्र, शिकारीचा घडलेला प्रकार आणि त्यानंतर वनविभागाने जंगल परिसरात सुरु ठेवलेली गस्त यामुळे शिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे या परिसरातील शिकारीला काही प्रमाणात आळा बसणार असल्याने या परिसरातील प्राणीमित्रांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)

गावात चर्चा
गावात चर्चा
हळदीचे भोम या परिसरात दोन दिवस फिरल्यानंतरही वनविभागाच्या अधिकाऱ्यांना शिकारीबाबतचा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. मांसाची विल्हेवाट लावलेल्या ठिकाणी काही केस आढळून आले. परंतु, वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या गस्तीनंंतरही शिकारी कशा होतात, याचेच आश्चर्य वाटत आहे. वनाधिकाऱ्यांनी शिकारीनंतर मांस व अन्य मुद्देमाल जाळलेल्या जमीन मालकाचा जबाबही नोंदवून घेतला. दोन दिवस या जंगलात वन अधिकाऱ्यांची फिरती असल्यानंतरही बुधवारी रात्रीही सुमारे साडेनऊच्या दरम्यान या जंगलात बॅटरीच्या प्रकाशाचे झोत दिसून येत होते. मळेवाड गोवा रस्त्यापासून काही अंतरावरच प्रकाश दिसत असल्याने यामागे शिकारीच जंगलात फिरत असल्याची चर्चा नाक्यावर रंगलेली होती.

Web Title: 'Those' are not proof of hunter