शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 11:02 IST2025-10-26T10:59:56+5:302025-10-26T11:02:31+5:30
INS Guldar : भारताच्या सागरी पर्यटनाच्या इतिहासात लवकरच एक ऐतिहासिक टप्पा गाठला जाणार आहे.

शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
संदीप बोडवे
भारताच्या सागरी पर्यटनाच्या इतिहासात लवकरच एक ऐतिहासिक टप्पा गाठला जाणार आहे. मोठ्या युद्धनौका आता केवळ संग्रहालयांत पाहायला मिळणार नाहीत, तर थेट समुद्राच्या तळाशी उतरून अनुभवता येणार आहेत. महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि वेंगुर्ला जवळील निवती समुद्रात निवृत्त झालेली भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस गुलदार लवकरच पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळ रीफ मध्ये रूपांतरित होणार आहे. हा उपक्रम केवळ इतिहासप्रेमींना आणि स्कुबा डायव्हर्सना नव्हे तर सागरी पर्यटन व पर्यावरण संवर्धनासाठी देखील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
आयएनएस गुलदारचा समृद्ध वारसा....
१९८५ मध्ये पोलंडमधील ग्डिनीया शिपयार्ड येथे बांधलेली. उंची २२मी. लांबी ८३.९ मी. असलेली ही युद्ध नौका भारतीय नौदलात समाविष्ट झाली. आयएनएस गुलदार ही कुंभीर-वर्गातील लँडिंग शिप होती. उभयचर मोहिमांसाठी डिझाइन केलेले हे जहाज टाक्या, सैन्य व सामग्री किनाऱ्यांवर उतरवण्यासाठी वापरले जात असे. आपल्या ४० वर्षांच्या सेवाकाळात या युद्धनौकेने तब्बल ४९० लँडिंग ऑपरेशन्स पार पाडले आणि ३,९०० दिवस समुद्रात घालवले.
श्रीलंकेत शांतता मिशन, तस्करीविरोधी मोहिमा, तसेच १९९७ चे चक्रीवादळ आणि २००४ च्या त्सुनामीनंतरची आपत्ती निवारण मदत अशा अनेक महत्वपूर्ण भूमिका याने पार पाडल्या. १२ जानेवारी २०२४ रोजी, आयएनएस चित्ता आणि कुंभीर या सहकारी जहाजांसह, गुलदारने औपचारिक निवृत्ती घेतली.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) या प्रकल्पाचे नेतृत्व करत असून, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या विशेष सहाय्य योजनेतून ४६.९१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आयएनएस गुलदार सध्या विजयदुर्ग जेट्टीवर डॉक केले गेले असून, लवकरच ते निवती समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर, २५ मीटर खोल समुद्रात नियोजितपणे बुडवले जाणार आहे.
या प्रक्रियेसाठी माझगाव डॉकचे तज्ञ आणि मेरीटाईम बोर्डाच्या मान्यतेने काम सुरू होणार आहे. या जहाजातील सर्व प्रदूषनकारी साहित्य आधीच काढून टाकले गेले आहे. डायनामाइट किंवा ब्लोटॉर्चच्या मदतीने विशेष छिद्र तयार करून जहाजाचे नियंत्रित स्कटलिंग (बुडविणे) केले जाईल, जेणेकरून ते सरळ तळाशी बसेल.
डायव्हिंग पर्यटनातला नवा प्रकार
जगभरात अशा प्रकारचे डायव्हिंग साहसी पर्यटनाची एक वाढती संधी आहे. फ्लोरिडामधील यूएसएस ओरिस्कनी, कॅलिफोर्नियातील एचएमसीएस युकोन, यूकेचा एचएमएस स्कायला, तसेच कॅनडाचा एचएमसीएस सस्काचेवान हे त्याचे उत्तम उदाहरणे आहेत. ही ठिकाणे अनुभवी ड्रायव्हर्सना केवळ साहस नाही, तर समुद्री जैवविविधता आणि ऐतिहासिक अनुभवही देतात. भारतात लक्षद्वीप व अंदमान हे डायव्हिंगसाठी ओळखले जातात, मात्र कोकण किनाऱ्याच्या माध्यमातून पश्चिम किनारपट्टीवरही हे आकर्षण विकसित होऊ शकते.
पाणबुडी पर्यटनाची जोड
कोकण किनारपट्टी पर्यटनासाठी प्रसिद्ध असली तरी पाण्याखालील जलपर्यटनासाठी ती अजून विकसित व्हायची आहे. आयएनएस गुलदार प्रकल्पामुळे या भागात डायव्हिंगसाठी एक नवीन केंद्र तयार होईल. सुरुवातीला हे ठिकाण उत्साही आणि साहसी स्कुबा डायव्हिंग साठी खुले असेल. भविष्यात पाणबुडीसारख्या नौका वापरून पर्यटकांना आरामात पाण्याखालील संग्रहालय पाहता येईल.
अदभुत असे प्रकल्प स्थळ
प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या देवबाग (मालवण) येथून समुद्रात दक्षिणेकडे १० किलोमीटर आणि निवती (वेंगुर्ला) येथून पश्चिमेस ४ किमी वर निवती लाईट हाऊस जवळ हे प्रकल्प स्थळ (स्कटलिंग साइड) निश्चित करण्यात आली आहे. समुद्रात असलेल्या या खडकाळ बेटांना निवती रॉक्स असे म्हणतात. सागरी जीव सृष्टीने ही जागा समृध्द आहे. या ठिकाणी समुद्रात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायविंग अँड ॲक्वाटीक स्पोर्ट्स (इसदा) एमटीडीसी अंतर्गत स्कुबा डायविंगचे प्रशिक्षण दिले जाते.
कृत्रिम रीफ: पर्यावरणासाठी संधी आणि जबाबदारी
जगभरात जहाज बुडवून तयार करण्यात आलेले कृत्रिम प्रवाळ रीफ अनेक ठिकाणी यशस्वी ठरले आहेत. बुडवलेले जहाज लवकरच सागरी जीवनाचे अधिवास बनते — लहान मासे, प्रवाळ, शैवाल, अपृष्ठवंशी जीव यांची वाढ सुरू होते. यामध्ये
स्थानाची निवड, स्वच्छता, पर्यावरण मानके आणि देखभाल यावर अवलंबून असते.
आयएनएस गुलदारचे पाण्याखाली रूपांतर केवळ एक पर्यटन प्रकल्प नाही, तर भारताच्या सागरी परंपरेचा आदर करणारा, पर्यावरण संवर्धनाला चालना देणारा आणि कोकणातील पर्यटनाच्या नव्या पर्वाची सुरुवात करणारा ऐतिहासिक टप्पा ठरेल. डिसेंबर २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा असून, लवकरच भारतीय सागरी पर्यटनात एक नवीन आणि रोमांचकारी पर्व सुरू होणार आहे