Maharashtra Budget 2025: अर्थसंकल्पात मत्स्य व बंदरे विकास खात्याला आतापर्यंतची सर्वात जास्त तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 18:34 IST2025-03-11T18:34:43+5:302025-03-11T18:34:43+5:30
कणकवली: झपाट्याने काम करणारे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला अर्थसंकल्पात सरकारने फार मोठी तरतूद ...

Maharashtra Budget 2025: अर्थसंकल्पात मत्स्य व बंदरे विकास खात्याला आतापर्यंतची सर्वात जास्त तरतूद
कणकवली: झपाट्याने काम करणारे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला अर्थसंकल्पात सरकारने फार मोठी तरतूद करून दिली आहे. बंदरे विकासासाठी ४८४ कोटी तर मत्स्य व्यवसायासाठी २४० कोटींची तरतूद केली आहे. दोन्ही खात्यांचे मिळून ७२४ कोटी रुपयेची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. यामुळे कोकणातील मत्स्य व्यवसायिकांसाठी तसेच बंदर विकासासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास खात्यांसाठी अर्थसंकल्पातील आत्तापर्यंतची सर्वात जास्त तरतूद केली आहे. मत्स्य व्यवसाय वाढीसाठी तसेच बंदर विकासासाठी मंत्री नितेश राणे यांनी गेल्या शंभर दिवसाच्या कालावधीत फार मोठ्या प्रमाणात काम सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या त्यांच्या कामाची दखल घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात भरीव तरतूद करण्यासंदर्भात निर्णय घेतला आणि तशा पद्धतीने अर्थसंकल्पात तो दिसून आला.
बंदरे विकासासाठी ४८४ कोटी तर मत्स्य व्यवसायासाठी २४० कोटी असे मिळून ७२४कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात अनेक कामाचा समावेश होणार आहे. बंदर विकासाबरोबरच मच्छीमारांचे प्रश्न सुद्धा या माध्यमातून सूटणार आहेत. मुंबईतील बंदरावर निर्यातीसाठी येणारा ताण लक्षात घेता कोकणातील बंदरे विकसित झाली तर व्यावसायिकांसाठी ते दिलासादायक ठरेल. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील व्यावसायिकांसाठी वेळेचीही बचत होईल. त्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे या खात्याकडून पुढील काही काळात मोठ्या कामांची अपेक्षा केली जात आहे.