Anganewadi Jatra 2026 Date: आंगणेवाडीच्या भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव ९ फेब्रुवारी २०२६ रोजी, देवीला कौल लावून तारीख निश्चिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:55 IST2025-12-03T14:54:07+5:302025-12-03T14:55:14+5:30
Anganewadi Bharadi Devi Jatra 2026 Date: लाखो भाविकांचे आहे श्रद्धास्थान

Anganewadi Jatra 2026 Date: आंगणेवाडीच्या भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव ९ फेब्रुवारी २०२६ रोजी, देवीला कौल लावून तारीख निश्चिती
मालवण : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा ९ फेब्रुवारी २०२६ रोजी निश्चित झाली आहे. बुधवारी (दि.३) रोजी सकाळी देवीचा हुकूम घेऊन ही तारीख निश्चित करण्यात आली. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या जत्रेला उपस्थिती दर्शवतात. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात. वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी ‘याचि देही, याचि डोळा’ पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीयांसह आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी दिली आहे.
अनेक व्यापारी, व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात.