Sindhudurg: दारूने भरलेला कंटेनर ताब्यात, दोघांना अटक; १ कोटीचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:35 IST2025-10-08T15:32:33+5:302025-10-08T15:35:05+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Sindhudurg: दारूने भरलेला कंटेनर ताब्यात, दोघांना अटक; १ कोटीचा मुद्देमाल जप्त
बांदा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने इन्सुली तपासणी नाका गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली. सुमारे १ कोटी ८ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
इन्सुली राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, उत्पादन शुल्क पथकाने सोमवारी रात्री १ वाजताच्या सुमारास गोवा बनावटीच्या रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीच्या ७२ हजार बाटल्या (१५०० खोके) भरलेल्या कंटेनरला थांबवले. जप्त झालेल्या मद्याची किंमत सुमारे ९३ लाख ६० हजार रुपये, तर टाटा मोटर्स कंपनीचा बाराचाकी कंटेनर (जीजे-१०-झेड -९९८४) अंदाजे १५ लाख रुपये, तसेच दोन अँड्रॉइड मोबाइल मिळून एकूण १ कोटी ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या कारवाईत रामनिवास (वय २५, रा. बाडमेर, राजस्थान) व नूर आलम (वय २६, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही झालेली कारवाई राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, अंमलबजावणी व दक्षता सहआयुक्त पी. पी. सुर्वे, विभागीय उपआयुक्त, कोल्हापूर विजय चिंचाळकर आणि अधीक्षक, सिंधुदुर्ग कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत धनंजय साळुंखे (दुय्यम निरीक्षक), विवेक कदम (दुय्यम निरीक्षक) तसेच जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे, सतीश चौगुले, अभिषेक खत्री, सागर सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे हे करीत आहेत.