घरात सापडलेल्या पैशांचा स्रोत पूर्णपणे कायदेशीर, विजय केनवडेकर यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:32 IST2025-11-28T13:31:39+5:302025-11-28T13:32:15+5:30
...तर राजकीय संन्यास घेईन

घरात सापडलेल्या पैशांचा स्रोत पूर्णपणे कायदेशीर, विजय केनवडेकर यांचा दावा
मालवण : आमदार नीलेश राणे यांनी आपल्या निवासस्थानी अनधिकृत प्रवेश करून दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप करत हा सर्व प्रकार निंदनीय असल्याचे भाजपचे जिल्हा चिटणीस विजय केनवडेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले, तसेच घरात सापडलेल्या पैशांचा स्रोत पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावाही त्यांनी केला.
विजय केनवडेकर म्हणाले, बुधवारी सायंकाळी आपली वयोवृद्ध आई, वहिनी आणि पुतण्या घरात असताना आमदार नीलेश राणे यांनी थेट शूटिंग करत घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. ते माझ्या बेडरूममध्येही गेले. हा प्रकार निंदनीय आहे. माझे कुटुंबीय दहशतीखाली आहे.
सापडलेला पैसा माझ्या ‘केके बिल्डर’ या व्यवसायातील आहे.
वाचा : ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा का नाही, नीलेश राणे यांचा सवाल
पत्नी वेदिका केनवडेकर या व्यवसायात असून, मालवण येथील फोवकांडा पिंपळ येथे त्यांच्या टॉवरचे काम सुरू आहे. रेरा रजिस्ट्रेशन, फर्म रजिस्ट्रेशन आणि जीएसटी क्रमांक घेतला आहे. दररोज माझ्याकडे येणारा कारपेंटर असेल, सेंट्रिंगवाला असेल, याला मला चेकने पैसे देता येत नाहीत आणि मला जे पैसे दिले ते माझ्या नातेवाइकांनी आणि मित्रांनीच दिलेले आहेत. याचे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, असेही ते म्हणाले.
वाचा : व्यवसायामुळे घरात पैसे ठेवल्यास चूक काय?, राजकीय चष्म्याने पाहू नका - नितेश राणे
...तर राजकीय संन्यास घेईन
मी पक्षबदलू आणि स्वार्थी नाही. मला खूप प्रलोभने आली; पण मी कधी स्वार्थ ठेवून भारतीय जनता पार्टी सोडली नाही. दत्ता सामंत आणि वैभव नाईक यांनी जर आपण कोणाला पैसे दिले हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखविले, तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.
२० लाखांची रक्कम, संनियंत्रण समितीच्या अहवालानंतर कार्यवाही
तपास यंत्रणेने विजय केनवडेकर यांच्या घरात सापडलेल्या रकमेचा पंचनामा केला. यावेळी ५०० रुपयांच्या १०० नोटा असलेली ४० बंडले सापडून आल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. ही रक्कम जमा करण्यात आली असून, जिल्हाधिकाऱ्यांजवळ हे प्रकरण चौकशीसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या संनियंत्रण समिती यावर आपला अहवाल देणार असून, त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.