सिंधुदुर्ग एस.टी. विभागाची मालमत्ता जप्ती थांबली, अपघाताच्या प्रकरणाने पुन्हा वेधले लक्ष; नुकसानभरपाई व्याजासह कोटीमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 15:46 IST2026-01-03T15:46:36+5:302026-01-03T15:46:56+5:30
जानवली अपघातात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचे न्यायालयीन प्रकरण

संग्रहित छाया
कणकवली : सन २००३ मध्ये झालेल्या दुचाकी आणि एस. टी. बसच्या अपघाताच्या प्रकरणाने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. जिल्हा न्यायालयाने जाहीर केलेल्या नुकसानभरपाई आदेशास अनुसरून, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी १ कोटी २ लाख ७९ हजार ४४७ रुपये भरपाईसाठी वसुली दरखास्त दाखल केली होती. शुक्रवारी (दि.२) कणकवली न्यायालयाचे बेलिफ आणि अधिकाऱ्यांनी एस. टी. महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभाग कार्यालयात मालमत्ता जप्ती करण्यासाठी हजेरी लावली होती.
या घटनेने एस.टी.च्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली. सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांनी वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनात कार्यवाहीचा निर्णय घेतला. त्यांनी संबंधित अधिकारी मीनल कांबळी यांच्याकडे १२ जानेवारी २०२६ पर्यंत रक्कम अदा करण्यासाठी मुदत मागितली. या मागणीला दाद देत दरखास्तदारांनी दिलेल्या मुदतीमुळे तूर्तास मालमत्ता जप्ती टाळण्यात आली आहे.
नुकसानभरपाईची रक्कम व्याजासह १ कोटी १९ लाख ८२९
सन २००३ मध्ये मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या घटनेत देवगडच्या निशिकांत कांबळी यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या नुकसानभरपाईसाठी २०१२ साली एस.टी.कडून ४७ लाख ८२ हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश होते. मात्र, एस. टी. महामंडळाने उच्च न्यायालयात अपील केले. ते अपिल रद्द झाल्यानंतर आता नुकसानभरपाईची रक्कम व्याजासह १ कोटी १९ लाख ८२९ रुपये इतकी झाली आहे.
१२ जानेवारीपूर्वी तातडीने रक्कम अदा करण्याचे आश्वासन
शुक्रवारी झालेल्या जप्तीच्या आदेशांतर्गत दोन लाल रंगांच्या एस. टी. बसेस, दोन वातानुकुलित शिवशाही बसेस व अन्य मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश होते. मात्र, वरिष्ठांच्या निर्देशांनंतर आणि धनादेशाच्या प्रक्रियेनंतर, तूर्तास न्यायालयाच्या आदेशानुसार मालमत्ता जप्तीची कार्यवाही स्थगित करण्यात आली आहे. १२ जानेवारीपूर्वी एस.टी. महामंडळाने तातडीने रक्कम अदा करण्याचे आश्वासन दिले आहे.