सिंधुदुर्ग : कोकणातील शिक्षक भरतीत स्थानिकांना 70 टक्के आरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 17:08 IST2018-04-04T16:43:38+5:302018-04-04T17:08:51+5:30
कोकणातील शिक्षक भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना 70 टक्के आरक्षण द्यावे, असा आग्रह कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे धरला आहे. आमदार डावखरे यांनी शिक्षण मंत्री तावडे यांची मंत्रालयात काल मंगळवारी भेट घेऊन निवेदन दिले.

कोकणातील शिक्षक भरतीत स्थानिक उमेदवारांना 70 टक्के आरक्षण देण्याच्या मागणीचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन देताना कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे.
सिंधुदुर्गनगरी : कोकणातील शिक्षक भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना 70 टक्के आरक्षण द्यावे, असा आग्रह कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे धरला आहे. आमदार डावखरे यांनी शिक्षण मंत्री तावडे यांची मंत्रालयात काल मंगळवारी भेट घेऊन निवेदन दिले.
शिक्षकांच्या भरतीत 2010 पूर्वी स्थानिकांना आरक्षण होते. त्यामुळे स्थानिक तरुण-तरुणींना नोकरी मिळत असे. विशेषतः ते जिल्ह्यातील मूळ रहिवाशी असल्यामुळे परजिल्ह्यात बदलीसाठी प्रयत्न करीत नसत. त्यामुळे कोकणातील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या पुरेशी होती. मात्र, 2010 मध्ये राज्यस्तरीय शिक्षक भरती झाल्यामुळे कोकणात परजिल्ह्यातील शिक्षकांची नियुक्ती झाली.
परंतु, त्यांना मूळ जिल्ह्यात जाण्याचे वेध लागले असून, दरवर्षी 500 ते 600 शिक्षकांची बदली होत आहे. त्यामुळे कोकणातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होत आहे, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. या पार्श्वभूमीवर आगामी शिक्षक भरतीत स्थानिकांना 70 टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी डावखरे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.
गेल्या आठ वर्षांपासून शिक्षक भरती न झाल्यामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील डीएड-बीएड धारक तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातून परजिल्ह्यातील शिक्षक उमेदवारांना रुजू होऊ न देण्याचा इशाराही संघटनांकडून दिला जात आहे, याकडे शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.
कोकणातील बेरोजगार शिक्षकांना नोकरी मिळण्याबरोबरच शाळांमध्ये पुरेसे शिक्षक राहण्यासाठी स्थानिकांना नोकरीत 70 टक्के आरक्षण देण्याची गरज आहे, असे आमदार डावखरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.