शिक्षणाचे राजकारण करणे थांबवावे, बहुजनांच्या शिक्षणात खोडा न घालण्याचे तावडे यांचे शरद पवारांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 05:28 AM2018-04-02T05:28:21+5:302018-04-02T05:28:21+5:30

सरकारने १,३०० मराठी शाळा बंद केल्याचा अपप्रचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांच्या टीकेने सरकार बदनाम होणार नाही, परंतु त्यामुळे बहुजन समाजातील मुले गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहतील. या समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळू नये, म्हणूनच त्यांचा हा आटापिटा चालला आहे का, अशी शंका येत असल्याचा आरोप शिक्षण आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी ठाण्यात केला.

 Sharad Pawar urges people to stop politics of education | शिक्षणाचे राजकारण करणे थांबवावे, बहुजनांच्या शिक्षणात खोडा न घालण्याचे तावडे यांचे शरद पवारांना आवाहन

शिक्षणाचे राजकारण करणे थांबवावे, बहुजनांच्या शिक्षणात खोडा न घालण्याचे तावडे यांचे शरद पवारांना आवाहन

Next

ठाणे  - सरकारने १,३०० मराठी शाळा बंद केल्याचा अपप्रचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांच्या टीकेने सरकार बदनाम होणार नाही, परंतु त्यामुळे बहुजन समाजातील मुले गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहतील. या समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळू नये, म्हणूनच त्यांचा हा आटापिटा चालला आहे का, अशी शंका येत असल्याचा आरोप शिक्षण आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी ठाण्यात केला. पवार पिता-पुत्रीने शिक्षण क्षेत्राचे राजकारण करणे थांबवावे, असे आवाहनही त्यांनी जाहीरपणे केले.
ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील शतकोत्तर ग्रंथालयांच्या संमेलनाचे उद््घाटन तावडे यांच्या हस्ते पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. मी शिक्षणमंत्री झाल्यापासून चांगले निर्णयही वादग्रस्त कसे केले जातात, हे शिकलो, असा टोला त्यांनी लगावला.
शाळेतील शिक्षक ग्रंथालये उघडू शकत नाहीत का? त्यासाठी ग्रंथपालच लागतो का? ग्रंथालये वाढायला हवीत, पण ग्रंथपाल नाहीत, म्हणून ग्रंथालये नाहीत, या वृत्तीवर त्यांनी टीका केली. जिथे कल्पक शिक्षक असतात, तेथे ग्रंथालयाच्या उभारणीसाठी अशी कारणे पुढे येत नाहीत. दोन लाख ४० हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या राज्यात ५७ हजार कोटींचा खर्च हा सगळ्या प्रकारचे शिक्षण, त्यासंबंधी बाबी, ग्रंथालयांवर खर्च होतात. त्यामुळे अनुदान, वेतनवाढ या अपेक्षा असल्या, तरी त्या आताच्या घडीला पूर्ण करणे अवघड आहे, असे सांगत, त्यांनी त्या मागण्या फेटाळून लावल्या.
महानगरपालिका आणि नगरपालिकांनी शहरातील विविध जागी मराठी पुस्तकांची विक्री करण्यासाठी ५०० चौरस फुटांचे गाळे माफक दरात उपलब्ध करून देण्याची सूचना तावडे यांनी केली.
पुस्तक वाचल्यामुळे काय घडते, ते सांगताना शिक्षणमंत्री म्हणाले, शंकरराव खरात यांचे ‘तराळ-अंतराळ’ हे आत्मचरित्र वाचल्यावर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला दिलेले आरक्षण किती संयुक्तिक आहे, हे समजले. इंग्रजी भाषेला कोणाचा विरोध नाही. ती रोजगाराची भाषा आहे, परंतु जगभर मातृभाषेतून शिक्षणाची चळवळ जोर धरत आहे. मराठी भाषेतून मूल शिकले म्हणजे ते मागे पडते, हा भ्रम आहे. प्रगत शिक्षण अभियानाच्या माध्यमातून आम्ही मराठी माध्यमांच्या जिल्हा परिषदेच्या शाळांत अ‍ॅक्टिव्हिटी बेस लर्निंग व स्पोकन इंग्लिश सुरू केले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत जवळपास २५ हजार मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून, मराठी माध्यमातील जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली.
ग्रंथसंग्रहालयाचे कार्याध्यक्ष प्रा. विद्याधर वालावलकर यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी, मातृभाषेवर कितीही आक्रमण आले, तरी त्याविरोधात कंबर कसण्याचे आवाहन केले. या वेळी कार्यवाह विद्याधर ठाणेकर यांच्या ‘धगधगत्या काश्मिराचे वास्तव’ या पुस्तकाचे प्रकाशन तावडे यांच्या हस्ते झाले. संजीव ब्रह्मे यांनी अध्यक्षीय भाषण केले. या वेळी शिवसेनेचे सभागृह नेते नरेश म्हस्के हेही उपस्थित होते. सूत्रसंचालन साधना जोशी यांनी केले.

एकही आमदार नसलेला नेता

सीबीएसई पेपरफुटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुठल्याही परिस्थितीत फेरपरीक्षा देऊ नका, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले होते. त्यावर तावडे यांना विचारता, ज्या पक्षाचा एकही आमदार नाही, त्यांच्या भूमिकेवर काय बोलायचे, असा टोला लगावला. खासगी क्लासेसमुळे, शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे सीबीएसईचे पेपर फुटले.

सोशल मीडियामुळे हे प्रकार वाढत आहेत. त्याला आळा बसवण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेले धोरण केंद्र सरकारला पाठविले जाईल. ते केंद्र सरकार स्वीकारेल, अशी अपेक्षा तावडेंनी व्यक्त केली.

मेरिटवर शिक्षकभरती : लाखो रुपये घेऊन शिक्षकभरती केली जाते, फसवणूक होते, ती थांबविण्यासाठी शिक्षकांची नेमणूक आता त्या-त्या शिक्षण संस्थांना करता येणार नाही. राज्यभरात मेरिटप्रमाणे शिक्षकभरती होईल, असे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले.

Web Title:  Sharad Pawar urges people to stop politics of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.