कणकवलीत भाजपला रोखण्यासाठी शिंदे, उद्धवसेना एकत्र; नारायण राणेंचे दोन्ही सुपुत्र आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:40 IST2025-11-18T15:38:25+5:302025-11-18T15:40:15+5:30

Local Body Election: शहरविकास आघाडीच्या नावाखाली राज्यातील पहिलाच प्रयोग 

Shinde Uddhav Sena unite to stop BJP in Kankavali, Nilesh Rane Nitesh Rane face to face | कणकवलीत भाजपला रोखण्यासाठी शिंदे, उद्धवसेना एकत्र; नारायण राणेंचे दोन्ही सुपुत्र आमने-सामने

कणकवलीत भाजपला रोखण्यासाठी शिंदे, उद्धवसेना एकत्र; नारायण राणेंचे दोन्ही सुपुत्र आमने-सामने

सिंधुदुर्ग : राज्यात उद्धवसेना आणि शिंदेसेना यांच्यात विळ्या-भोपळ्याचे नाते पहायला मिळते. मात्र, राजकारणात कधी काही होईल हे सांगता येत नाही. कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी माजी नगराध्यक्ष तथा उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडीची स्थापन केली आहे.

या शहर विकास आघाडीत उद्धवसेना, शिंदेसेना, राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस अशा सर्वच पक्षांची नेतेमंडळी एकत्र आले असून, पक्षविरहित आघाडी म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
संदेश पारकर यांनी सोमवारी (दि. १७) या शहर विकास आघाडीच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजप आणि पर्यायाने पालकमंत्री नितेश राणे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी विरोधकांनी ही रणनीती आखल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मागील आठवड्यात काेकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती होण्याची इच्छा व्यक्त केली होती, तर शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यात युती झाल्यास भाजप कोकणात शिंदेसेनेसोबतचे राजकीय संबंध तोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर शिंदेसेना आणि भाजप दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेतेमंडळींच्या बैठकासुद्धा झाल्या. मात्र, शेवटपर्यंत महायुती झालीच नाही. त्यामुळे आता नारायण राणे भाजपचे खासदार म्हणून काय भूमिका घेणार? याकडेही जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

कणकवली वगळता सर्वत्र ना महायुती, ना महाविकास आघाडी

दुसरीकडे कणकवली नगरपंचायत वगळता जिल्ह्यातील अन्य तीन सावंतवाडी, मालवण आणि वेंगुर्ला या तिन्ही पालिकांमध्ये महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीदेखील झाली नाही. या तिन्ही ठिकाणी उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) वेगवेगळे लढत आहेत.

नारायण राणेंचे दोन्ही सुपुत्र आमने-सामने

शिंदेसेनेकडून नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र नीलेश राणे हे कुडाळ मालवण मतदारसंघात आमदार आहेत, तर कणकवली मतदारसंघातून आमदार आणि भाजपचे मंत्री असणारे नितेश राणे हे नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र या नव्या समीकरणामुळे एकमेकांविरोधात आपापल्या पक्षाची ध्येयधुरा सांभाळणार आहेत. म्हणजेच हे दोघे एकमेकांविरोधात असणार आहेत.

Web Title: Shinde Uddhav Sena unite to stop BJP in Kankavali, Nilesh Rane Nitesh Rane face to face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.