कणकवली पंचायत समितीच्या ८ जागा महिलांसाठी आरक्षित, सभापती पदासाठी 'या' मतदारसंघात चुरस होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 15:04 IST2025-10-13T15:02:48+5:302025-10-13T15:04:21+5:30
दहा माजी पंचायत समिती सदस्याना पुन्हा संधी

कणकवली पंचायत समितीच्या ८ जागा महिलांसाठी आरक्षित, सभापती पदासाठी 'या' मतदारसंघात चुरस होणार
कणकवली : कणकवलीपंचायत समितीच्या सदस्य पदासाठी १६ गणांचे आरक्षण आज, सोमवारी जाहीर झाले. त्यामध्ये आठ जागा महिलांसाठी तर आठ जागा पुरुषांसाठी आरक्षित झाल्या आहेत. सभापती पदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला राखीव झाल्याने नांदगाव आणि नाटळ पंचायत समिती गणातील महिला उमेदवार प्रमुख दावेदार ठरणार असल्याने चुरस निर्माण होणार आहे.
कणकवली पंचायत समितीच्या सदस्यपदांसाठी येथील तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या दालनात प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थित चिठ्ठयांद्वारे आरक्षण सोडत काढण्यात आली. या प्रक्रियेवेळी नायब तहसीलदार मंगेश यादव, एम. पी. मंडले, सत्यवान माळवे, श्रीराम राणे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
१६ गणांपैकी ८ गण महिलांसाठी राखीव झाले आहेत. महिलांसाठी राखीव झालेल्या गणांपैकी जानवली अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला आहे. या आरक्षणामुळे अनेकांचे पत्ते कट झाले असून नव्यांना संधी प्राप्त झाली आहे. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार जानवली मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. अनुसूचित जातीच्या जागेसाठी मागील पडलेले आरक्षण पाहून हा मतदारसंघ अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला.
त्यानंतर उर्वरित मतदारसंघांपैकी नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात कलमठ, कासार्डे, नांदगाव, नाटळ हे मतदारसंघ नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. ५० टक्के महिला आरक्षणानुसार नागरीकांचा मागास प्रवर्गासाठीसाठी राखीव झालेल्या मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवण्यासाठी चिठ्ठयांद्वारे सोडत काढण्यात आली. यात नांदगाव व नाटळ हे मतदारसंघ नागरीकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहेत.
उर्वरित ११ मतदारसंघांतून सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात बीडवाडी, लोरे, हरकुळ बुद्रुक, ओरसगाव, नरडवे हे मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाले आहेत तर फोंडा-करूळ, खारेपाटण, वरवडे, हरकुळ खुर्द, तळेरे, कळसुली हे मतदारसंघ सर्वसाधारणसाठी राखीव झाले आहेत.
नव्याने काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतील कणकवली पंचायत समितीच्या २०१७ मधील जवळपास दहा माजी पंचायत समिती सदस्याना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे तर सहा उमेदवारांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे काही सदस्यांचा हिरमोड झाला आहे. आरक्षण सोडतीसाठी विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आरक्षण सोडतीच्या चिठ्ठया विद्यामंदिरची विद्यार्थिनी देविश्री पाटील व विद्यार्थी पार्थ तेली यांच्या हस्ते काढण्यात आल्या. येत्या १७ ऑक्टोबरपर्यत आरक्षणावर हरकती नोंदविण्याचे आवाहन तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी केले आहे.