विविध मागण्यांसाठी ‘कास्ट्राईब’चे अनुसूचित जाती समितीला निवेदन

By Admin | Updated: August 26, 2015 22:58 IST2015-08-26T22:58:38+5:302015-08-26T22:58:38+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण समितीमध्ये इतर संघटनप्रमाणे मागासवर्गीय समितीचा प्रतिनिधी घेण्यात यावा

Request for the scheduled caste committee of Castrieb for various demands | विविध मागण्यांसाठी ‘कास्ट्राईब’चे अनुसूचित जाती समितीला निवेदन

विविध मागण्यांसाठी ‘कास्ट्राईब’चे अनुसूचित जाती समितीला निवेदन

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ शाखा सिंधुदुर्गच्यावतीने अनुसूचित जाती-जमाती कल्याण समितीची भेट घेऊन विविध मागण्यांविषयी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेनंतर संघटनेच्या मागण्यांबाबत योग्य तो निर्णय घेऊन न्याय देण्याचे आश्वासन समितीचे अध्यक्ष सुरेश खाडे यांनी दिले. यावेळी संघटनेच्यावतीने सुरेश खाडये यांच्यासह भाई गिरकर, हरीश पिंपळे, रमेश बुंदिले, प्रकाश गजभिये, जोगेंद्र कवाडे आदी आमदारांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्रमसाफल्य घरकुल योजनेंतर्गत नगर पालिकेतील पंचवीस वर्षे सेवा झालेल्या सफाई कामगारांना मोफत घरकुल योजनेचा आदेश लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, मोफत घरकुल योजनेची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती समितीकडून देण्यात आली. कास्ट्राईब संघटनेकडून देण्यात आलेल्या निवेदनातून समाज कल्याण विभागामार्फत कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्या समितीमध्ये कास्ट्राईब कर्मचारी कल्याण समितीचा एक प्रतिनिधी घेण्यात यावा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण समितीमध्ये इतर संघटनप्रमाणे मागासवर्गीय समितीचा प्रतिनिधी घेण्यात यावा, समाज कल्याण विभागामार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील मुलांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम मुलांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी, मुख्यालयी राहत असूनही मागासवर्गीय आरोग्य कर्मचाऱ्यांचे घरभाडे दिले जात नाही, हा कर्मचारी वर्गावर होणारा अन्याय दूर करावा, माध्यमिक शाळांमध्ये अनशेषाची पदे त्वरित भरण्यात यावीत, जातपडताळणी कार्यालय जिल्ह्यात सुरू करण्यात आले असूनही कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आलेली नाही, त्याबाबत कार्यवाही करावी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक शिक्षकातून पदवीधर शिक्षकांच्या नेमणुका करताना १०० टक्के बिंदूनामावली लागू करून आरक्षणाप्रमाणे पदे भरावीत, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. या सर्व मागण्यांबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन समितीचे अध्यक्ष सुरेश खाडये यांनी दिले.
या भेटीवेळी संघटनेच्यावतीने कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्याचे सहसचिव डी. एम. चाटे, कोकण विभागीय अध्यक्ष जी. बी. चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, सचिव नरेश कारिवडेकर, कार्याध्यक्ष रमाकांत जाधव, उपाध्यक्ष शिवाजी पवार, माध्यमिक संघटनेच्या सचिव वसुंधरा चव्हाण, आरोग्य कर्मचारी संघटनेचे सचिव आर. बी. चव्हाण, सदानंद सांगेलकर, दिनेश जाधव, काशिनाथ बागेवाडी, प्रदीप सर्पे आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Request for the scheduled caste committee of Castrieb for various demands