वाचन संस्कृतीला पुनरुज्जीवन मिळणे गरजेचे

By Admin | Updated: January 12, 2015 00:58 IST2015-01-12T00:57:56+5:302015-01-12T00:58:15+5:30

तानाजी चोरगे : चिपळूण येथील शतायु ग्रंथालये व ग्रंथकार अधिवेशनाचे सूप वाजले

Reading culture needs to be revived | वाचन संस्कृतीला पुनरुज्जीवन मिळणे गरजेचे

वाचन संस्कृतीला पुनरुज्जीवन मिळणे गरजेचे

चिपळूण : मोबाईल व व्हॉटस् अ‍ॅपमुळे वाचन संस्कृती कमी होत आहे. आई हा शब्द कालांतराने हद्दपार होतोय की काय, अशी भीती असून, वाचन संस्कृती जपण्यासाठी तिचे पुनरुज्जीवन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व साहित्यिक डॉ. तानाजी चोरगे यांनी येथे केले.
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरतर्फे शतायु ग्रंथालय व ग्रंथकार अधिवेशन कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचे अध्यक्ष अरविंद जाधव, कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह प्रकाश काणे, माजी आमदार रमेश कदम, सागर देशपांडे उपस्थित होते.
ग्रामीण भागामध्ये ग्रंथालय सुरू झाले. लोकमान्य टिळक वाचन मंदिरने शतक पूर्ण केले. साहित्य निर्माण करणे हे सोपे असले तरी त्यापेक्षा प्रकाशक मिळणे व पुस्तक छापून घेणे, ते वितरित करणे हे अत्यंत जिकिरीचे काम असते. पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ग्रंथालये करीत आहेत. मुलांना वाचनाची सवय लावली पाहिजे. वाचनामुळे नैतिक मूल्य काय आहे हे त्यांना समजेल, असेही डॉ. चोरगे म्हणाले.
सार्वजनिक व खासगी वाचनालयांची आर्थिक काळजी कमी होण्यासाठी वाचनालये ही ग्रंथ विक्री केंद्रे व्हायला हवीत. त्यातूनच आर्थिक श्रेय मिळेल. पुस्तकाचा सहवास लहान मुलांनी घेण्याची गरज आहे. यामधून चांगल्या व्यक्तींची माहिती मिळेल. चांगली माणसं कळायला वेळ लागतो. बदलत्या काळात अदृश्य झालेली माणसे नव्या पिढीसमोर आणण्यासाठी काम केले पाहिजे, असे सागर देशपांडे यांनी सांगितले.

Web Title: Reading culture needs to be revived