वैभव नाईकांविरूद्ध ॲट्रॉसिटी कलम रद्द करा, अन्यथा..; सतीश सावंत यांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 17:59 IST2025-10-04T17:59:22+5:302025-10-04T17:59:22+5:30
सतीश सावंत : खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्याचा प्रयत्न

वैभव नाईकांविरूद्ध ॲट्रॉसिटी कलम रद्द करा, अन्यथा..; सतीश सावंत यांनी दिला इशारा
कणकवली : माजी आमदार वैभव नाईक यांच्याविरूद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल केलेली कलमे रद्द करावीत, अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडेल, असा इशारा मराठा समाजाचे नेते सतीश सावंत यांनी शुक्रवारी दिला आहे.
याबाबतच्या प्रसिध्दी पत्रकात त्यांनी सांगितले की, मुंबई - गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या महामार्गावर वाहतूक करणे जीवघेणे ठरत आहे. अनेक ठिकाणी अपघात झाले असून, नागरिकांचा मृत्यूही झाला आहे. झाराप येथेही चुकीच्या मिडलकटमुळे अपघात झाला आणि एका शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. महायुतीचे सत्ताधारी नेते, अधिकारी आणि ठेकेदार मात्र महामार्गाच्या या दुरवस्थेमुळे होणाऱ्या मृत्यूंना उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत; त्यांना जनतेच्या जिवाची पर्वा नाही.
झाराप येथील अपघाती मृत्यू समजताच माजी आमदार वैभव नाईक यांनी तत्काळ तिथे धाव घेत महामार्गाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले. मात्र, महामार्गाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांनी वैभव नाईक यांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याची खोटी तक्रार पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार वैभव नाईक यांच्याविरूद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
सत्ताधारी तसेच संबंधीत अधिकाऱ्यांनी ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
म्हणूनच, वैभव नाईक यांच्याविरूद्ध दाखल केलेली कलमे रद्द केली नाहीत तर मराठा समाज रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडेल, असे सतीश सावंत यांनी स्पष्ट केले.
तसेच, अशा खोट्या तक्रारींमुळे ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला गेल्यास, ज्यांना खरोखरच न्याय मिळायला हवा, अशा अनुसूचित जाती-जनजातींना न्याय मिळणार नाही. त्यामुळे खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करणाऱ्यांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची आवश्यकता असल्याची मागणी सतीश सावंत यांनी केली आहे.