राजकीय पक्ष, पदाधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करा : रमेश पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 20:05 IST2020-12-19T20:03:08+5:302020-12-19T20:05:46+5:30
Kankvali Grampanchyat- कणकवली तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी राजकीय पक्षांनी घ्यावी. अशा सूचना कणकवली तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी रमेश पवार यांनी दिल्या.

कणकवली तहसील कार्यालयात आयोजित ग्रामपंचायत निवडणुकीबाबत आचारसंहिता आढावा बैठकीत तहसीलदार रमेश पवार यांनी मार्गदर्शन केले.
कणकवली : तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे या निवडणुका शांततेत पार पाडण्याच्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी राजकीय पक्षांनी घ्यावी. अशा सूचना कणकवली तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी रमेश पवार यांनी दिल्या.
कणकवली तालुका ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता आढावा बैठक तहसीलदार दालनात शुक्रवारी घेण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार सुजाता पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच राजकिय पक्ष पदाधिकारी यांची बैठकही घेण्यात आली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, माजी जिल्हा परिषद कृषी सभापती संदेश सावंत- पटेल, माजी उपसभापती महेश गुरव, तोंडवली बावशी माजी सरपंच बोभाटे आदींसह सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, अधिकारी उपस्थित होते.
आचारसंहिता पालन करताना खाते प्रमुखांना काही अडचणी आहेत का? अशी विचारणा तहसीलदारांनी केली. त्यांवर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध विकासकामांना मंजुरी मिळालेली आहे. त्यांना काम करताना अडचण येईल का? असे विचारले. तर तहसीलदारांनी काहीच अडचण नाही. पण नव्याने कामे सुरु करता येणार नाहीत. असे सांगितले.
सात मतदान केंद्र
१५ ते २१ जानेवारी हा निवडणूक आचारसंहिता कालावधी आहे. उमेदवारांना ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही अर्ज भरण्याची व्यवस्था आहे. ऑनलाईन अर्ज भरुन त्याची प्रत ऑफलाईन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर असलेल्या अर्जाची छाननी होईल. गांधीनगर १, भिरवंडे ३ व तोंडवली - बावशी ३ ठिकाणी मतदान केंद्र आहेत.