मोबाईल सेवा मार्चपर्यंत सुरळीत !

By Admin | Updated: February 1, 2015 00:36 IST2015-02-01T00:36:32+5:302015-02-01T00:36:32+5:30

सुहास कांबळे : सिंधुदुर्गात मोबाईल ग्राहक पाच लाखांपर्यंत नेणार

Mobile service is smooth till March! | मोबाईल सेवा मार्चपर्यंत सुरळीत !

मोबाईल सेवा मार्चपर्यंत सुरळीत !

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्रॉडबॅण्ड तसेच मोबाईल सेवा मार्च अखेरपर्यंत सुरळीत करण्यात येणार असून, मोबाईल ग्राहकसंख्या पाच लाखांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे मत बीएसएनएलचे महाप्रबंधक सुहास कांबळे यांनी मांडले. सावंतवाडीतील बीएसएनएल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रबंधक प्रकाश बिराजदार उपस्थित होते.

कांबळे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएल सेवेत मोठ्या प्रमाणात व्यत्यय आहेत. ही सेवा सुरळीत होण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात ग्राहकसंख्या वाढवण्यासाठी आणखी टॉवर उभारण्यात येणार असून जिल्ह्यात २५ बीटीस बसवण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात लॅण्डलाईन सुविधा कमी झाल्या नाहीत. गावागावात मोबाईल रेंजचा सर्व्हे सुरू आहे. रेल्वे थांबा तसेच महामार्गावर ही रेंज कमी येत असेल तर भविष्यात काय उपाययोजना कराव्या लागतील याची चाचपणी करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. सिंधुदुर्गमध्ये १६५ मोबाईल टॉवरपैकी १० टॉवर नादुरूस्त आहेत. हे टॉवर तत्काळ दुरूस्त करण्याच्या सूचनाही दिल्याचे सांगितले.

ठेकेदाराच्या गाडीतून महाप्रबंधकांचा बडेजाव

बीएसएनएलने निविदा काढून परवानाधारक गाड्या घेतल्या असताना बीएसएनएलच्या महाप्रबंधकांच्या दिमतीला मात्र, खासगी ठेकेदाराच्या अलिशान गाड्या असल्याची चर्चा येथील बीएसएनएलच्या कार्यालयात होती. याबाबत महाप्रबंधक सुहास कांबळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, परवानाधारक पिवळ्या नंबरच्या गाड्या घेऊन गेल्या तर पोलीस गाड्या कुठेही थांबवतात. त्यामुळे अशा गाड्या वापराव्या लागतात, अशी उत्तरे दिली. मात्र महाप्रबंधकाच्या या कृतीबाबत कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर आहे.



 

Web Title: Mobile service is smooth till March!