Sindhudurg-Local Body Election: मालवणमध्ये नीलेश राणे यांनी केले स्टींग, भाजप नेत्याच्या घरात पैसे; केनवडेकर म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:08 IST2025-11-27T16:04:10+5:302025-11-27T16:08:24+5:30
Local Body Election: निवडणूक आयोग काय कारवाई करणार ? : नीलेश राणे

Sindhudurg-Local Body Election: मालवणमध्ये नीलेश राणे यांनी केले स्टींग, भाजप नेत्याच्या घरात पैसे; केनवडेकर म्हणाले..
मालवण : मालवण नगरपालिका निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असतानाच बुधवारी (दि.२६) सायंकाळी मालवण कुडाळचे आमदार नीलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन केले. राणे यांनी थेट मालवण भाजपाचे जिल्हा चिटणीस व माजी तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या घरात छापा टाकला. यावेळी त्यांच्या घराच्या खोलीत मोठी रक्कम सापडली. राणे यांनी यावेळी निवडणूक विभागाच्या पथकाला व मालवण पोलिसांना पाचारण करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या. या घटनेमुळे मालवणात खळबळ उडाली आहे. प्रदेशाध्यक्ष मालवणमध्ये येऊन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर भाजपा पदाधिकाऱ्यांजवळ पैसे आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मालवण कणकवली व वेंगुर्ला नगरपालिका निवडणुकीत सत्तेतील दोन मित्रपक्ष विरोधात लढत असताना जिल्ह्यातील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. ऐन निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिंदेची शिवसेना यांच्यातील युती तुटली. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विरुद्ध नीलेश राणे यांच्यांत संघर्ष निर्माण झाला आहे.
हिशोबी नसलेली मोठी रक्कम जप्त
मालवण येथील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्ते विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी अवैध आणि हिशोबी नसलेली मोठी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यांच्या घरी आमदार नीलेश राणे यांनी अचानक भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत पैसे वाटताना बंड्या सावंत व अन्य कार्यकर्ते उपस्थित दिसत आहेत. या पैशांचा निवडणुकीत गैरवापर होणार होता, असा आरोप केला जात आहे.
निवडणूक काळात मतदारांना प्रलोभने देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अशा पैशांवर कारवाई होणे ही लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. मालवणच्या मतदारांनी सावध राहावे. लोकशाहीची पवित्रता राखण्यासाठी अशा कृत्यांचा धिक्कार करावा. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे.
निवडणूक आयोग काय कारवाई करणार ? : नीलेश राणे
निवडणूक पैसा फेकून जिंकायची नसते, कामाने आणि विश्वासाने जिंकायची असते! भारतीय जनता पार्टीचे रणजीत देसाई, मोहन सावंत असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तर मुंबईमधून कित्येक लोक पैसे वाटण्यासाठी खास येथे आलेले आहेत, यावरती निवडणूक आयोग काय कारवाई करणार त्याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे. - नीलेश राणे , आमदार , शिवसेना
आरोप चुकीचे
ही रक्कम माझ्या व्यवसायातील आहे. मी बांधकाम व्यावसायिक आहे. माझ्या घरात कोणतीही अनधिकृत रक्कम नाही. विरोधी आमदार यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. वातावरण बिघडविण्याचा हा प्रकार आहे. - विजय केनवडेकर, भाजपा, जिल्हा चिटणीस, मालवण
विरोधकांच्या पायांखालची वाळू सरकली : प्रभाकर सावंत
विजय केनवडेकर आमचे महत्त्वपूर्ण कार्यकर्ते आहेत. ते कोणतेही चुकीचे कृत्य करणार नाहीत. तपास यंत्रणा असताना त्यांच्या घरी आमदारांनी थेट जाणे योग्य नाही. हा बदनामी करण्याचा खेळ आहे. विरोधकांच्या पायांखालची वाळू सरकली आहे. आमच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करणे योग्य नाही. आमचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. मालवणचे मतदार विरोधकांना मतपेटीतून उत्तर देतील असे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सांगितले.