राजापूरसाठी कोल्हापूर येतंय आणखी जवळ

By Admin | Updated: January 30, 2015 23:12 IST2015-01-30T23:02:04+5:302015-01-30T23:12:06+5:30

काजिर्डा परिषद : बी. जी. कोळसेपाटील यांच्याहस्ते लगतच्या रस्त्याचे भूमिपूजन

Kolhapur is coming closer to Rajapur | राजापूरसाठी कोल्हापूर येतंय आणखी जवळ

राजापूरसाठी कोल्हापूर येतंय आणखी जवळ

राजापूर : काजिर्डा गावच्या मुळावर आलेला धरण प्रकल्प रद्द करा, अशी जोरदार मागणी दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या शेतकरी परिषदेत घुमल्यानंतर गावातून कोल्हापूरला लगतचा मार्ग ठरलेल्या रस्त्याचे भूमिपूजन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांच्या हस्ते पार पडले. अणुस्कूरा घाटापेक्षाही नजीकचा असा हा मार्ग असून, काजिर्डा घाटी पार केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याची हद्द सुरू होते. तेथून आठ किलोमीटर अंतरावर पडसाळी गाव येते. तेथून सुमारे ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर कोल्हापूर शहर येते. यापूर्वी शासनाने रस्त्याचे काम हाती घेतले होते. मात्र, नंतर अर्धवट सोडून देण्यात आले.गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ व पाटील म्हणून काम पाहणारे रामजी अप्पा पाटील हे १९७२ साली काजिर्डा गावचे सरपंच असताना तत्कालीन बांधकाम सभापती पु. ल. अण्णा वायकूळ यांच्या उपस्थितीत या घाटीरस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला होता. त्यावेळी लगतच्या कोळंब, मूर, काजिर्डा आदी गावातून माणसे मजूर म्हणून कामावर आली होती व त्या सर्वांना कामाचा मोबदला म्हणून गव्हाचे वाटप करण्यात आले होते, अशी माहिती स्वत: रामजी अप्पा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
त्यानंतर कामाला सुरुवात देखील झाली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष पद भूषविणारे तालुक्याचे सुपूत्र कै. भिकाजीराव चव्हाण हे आपल्या गाडीतून संपूर्ण घाट चढून गेले होते, अशीही माहिती रामजी पाटील यांनी दिली. तथापि गावात जामदा प्रकल्पाचे पडघम वाजू लागले व घाटमार्गे रस्त्याचा प्रश्न मागे पडला.
तालुक्याच्या पूर्व परिसरातील जामदा खोरे विभागातील ग्रामस्थ यांना कोल्हापूरला जाण्यासाठी लगतचा हा मार्ग आहे. आजही भले चांगला रस्ता नसला तरी काजिर्डा व त्या परिसरातील नागरिक कोल्हापूरला जायचे असेल, तर काजिर्डा गावाची घाटी चढून वर जातात. त्यानंतर पडसाळीतून कोल्हापूरसाठीची बस पकडतात. तत्पूर्वी साधारणत: अर्धा ते पाऊण तास घाटी चढायला लागतो. शिवाय या नियोजित मार्गाला मोठी अवघड स्वरूपात वळणे नाहीत. उलट सरळ असा चढाव आहे, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मात्र, गावात धरण प्रकल्पाचे काम सुरु झाल्याने कोल्हापूरला जाणाऱ्या या रस्त्याच्या कामालादेखील पूर्णविराम मिळाला आहे. या मार्गामुळे आता राजापूर तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांना या मार्गामुळे सोय होणार ्आहे. यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Kolhapur is coming closer to Rajapur