Local Body Election: सिंधुदुर्गात युती न होता लढतोय हेच आमचे दुर्दैव, मंत्री उदय सामंत यांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 13:55 IST2025-11-25T13:54:54+5:302025-11-25T13:55:48+5:30
नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून उभ्या असलेल्या उमेदवाराचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा आमदार नीलेश राणे यांचा आरोप

Local Body Election: सिंधुदुर्गात युती न होता लढतोय हेच आमचे दुर्दैव, मंत्री उदय सामंत यांची खंत
मालवण : येथील पालिका निवडणुकीच्या आडून काही जण आमदार नीलेश राणे यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुका येतील-जातील. पण एकमेकांचे संबंध टिकले पाहिजेत, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. भाजपकडून उमेदवारी दाखल करण्यात आल्यानंतर आम्ही उमेदवारी दाखल केली आहे. आमचं दुर्दैव आहे की, सिंधुदुर्गात युती न होता आम्ही लढत आहोत, असे मत उद्योगमंत्री तथा शिंदेसेना जिल्हा संपर्कमंत्री उदय सामंत यांनी येथे आयोजित जाहीर सभेत व्यक्त केले.
मालवण येथील शिंदेसेनेच्या प्रचार कार्यालयात सोमवारी (दि.२४) जाहीर सभा झाली. यावेळी आमदार नीलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर, उमेश नेरूरकर, महेश कांदळगावकर, संजय पडते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख राजेश मोरे आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, सिंधुदुर्गात युती झाली नाही, याचे सर्वात जास्त दुःख खासदार नारायण राणे यांना झाले आहे. त्यांची युती व्हावी, अशी इच्छा होती. मालवणातील शिंदेसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवणमध्ये येतील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
निवडणूक लढवायची असेल तर ताठ मानेने लढा
यावेळी सामंत म्हणाले, एखादी व्यक्ती मराठा समाजाची असताना ती ओबीसीचे जात प्रमाणपत्र घेते, यात तिच्याकडून मराठा आणि ओबीसी समाजाची फसवणूक केली जात आहे. याची नोंद मालवणवासियांनी घ्यायला हवी. निवडणूक लढवायची असेल तर ताठ मानेने लढायला हवी. मात्र, यात आपण ज्या जातीमध्ये जन्माला आलो ती जातच बदलायची म्हणजे दोन जातींचा अपमान केल्याची संपूर्ण महाराष्ट्रात पहिली घटना घडली आहे, अशीही टीका सामंत यांनी केली.
जातप्रमाणपत्र खोटे
पालिकेतील नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून उभ्या असलेल्या उमेदवाराचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप आमदार नीलेश राणे यांनी केला. तसेच याबाबत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती आणि पुरावे पत्रकारांसमोर सादर करणार आहे. आम्हाला या गोष्टींमध्ये जायचे नव्हते, मात्र आमच्या उमेदवाराच्या अर्जावर हरकत घेत तब्बल अडीच तास सुनावणी घेण्यात आली होती. यामुळे आम्ही आता भाजपच्या उमेदवाराच्या जात प्रमाणपत्राची सविस्तर माहिती घेतली आहे आणि जनतेसमोर ती मांडणार आहे, असेही राणे यांनी यावेळी सांगितले.