Narayan Rane : 'मी एका उपशाखा प्रमुखाला ठार मारणार होतो, बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून...'; नारायण राणेंनी सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 09:16 IST2026-01-05T09:15:20+5:302026-01-05T09:16:04+5:30
Narayan Rane : काल खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले.

Narayan Rane : 'मी एका उपशाखा प्रमुखाला ठार मारणार होतो, बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून...'; नारायण राणेंनी सांगितला किस्सा
Narayan Rane : राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. दुसरीकडे, काल (रविवारी) सिंधुदुर्गमध्ये खासदार नारायण राणे यांनी समर्थकांसह मोठे शक्ती प्रदर्शन केले. राणे समर्थकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती, यावेळी राणे यांनी मोठे विधान केले. शिवसेनेत असताना बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतचा किस्सा राणेंनी सांगितला. 'मी एका उपशाखाप्रमुखाची हत्या करणार होतो, पण बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी मला समजावलं असल्याचे राणेंनी सांगितले.
भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?
नारायण राणे म्हणाले, “माझ्या मित्राने मला सांगितलं तू निघू नकोस, आम्ही येतो. नेहमीच्या रस्त्याने तू जायचं नाही. एकाने तुझी टीप दिली आहे. टीप देण्याऱ्याचं मला नाव कळलं. मी त्यांना बोललो मी लगेच येतो. मी लगेच गाडी काढली आणि थेट त्या माणसाच्या घरी गेलो. मी दरवाजा नॉक केला. त्या उपशाखाप्रमुखाच्या पत्नीने मधला दरवाजा उघडला. मी तिला सांगितलं की मी तुझ्या पतीला ठार मारणार.
"यानंतर दुसऱ्या दिवशी मला बाळासाहेब ठाकरेंनी बोलावलं. मी तिकडे गेलो, तिकडे तो उपशाखाप्रमुखही बसला होता. बाळासाहेब म्हणाले तू या उपशाखाप्रमुखाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला बोललास ठार मारणार? तर मी म्हणालो की हो ठार मारणार. परत बाळासाहेब म्हणाले की मी तुला विचारतोय, तरी तू मारणार म्हणतोस.. मी म्हणालो, या माणसाने दाऊदच्या माणसाला माझी टीप द्यायची ठरवलं, मी त्याला जिवंत ठेवलं तर मी मरणार, त्यापेक्षा मी याला मारलं तर मी जगणार, असं राणे म्हणाले. "तेवढ्यात बाळासाहेब ठाकरे म्हणाले, नारायण मी तुला एक विनंती करू का. मी तुला सांगतो, तू त्याला जीवनदान देऊ शकतोस का? मी म्हणालो साहेब तुम्ही जे सांगाल ते होईल. बाळासाहेबांनी सांगितले म्हणून मी त्याला जीवनदान दिले. हा किस्सा काल राणे यांनी भरसभेत सांगितला.
सिंधुदुर्गात नारायण राणेंचं शक्तिप्रदर्शन
एकीकडे राज्यात मुंबईसह एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे आज कोकणातील सिंधुदुर्गामध्येभाजपाचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी गोव्याच्या सीमेजवळ असलेल्या बांद्यापासून ते कणकवलीपर्यंत राणे समर्थकांनी रॅली काढत आपण राणेंसोबत असल्याचा संदेश दिला. तर नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीवेळी आमने-सामने आलेले भाजपाचे आमदार व मंत्री नितेश राणे आणि शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे हे बंधूसुद्धा हसत खेळत एकत्र आलेले दिसले. दरम्यान, कणकवली येथे झालेल्या मेळाव्यातून मला ऊर्जा मिळाली आहे. मतभेद निर्माण करणाऱ्यांना थारा देऊ नका, असं आवाहनही नारायण राणे यांनी केलं.
डिसेंबर महिन्यात झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिंदेसेनेमध्ये मुख्य लढत झाली होती. तसेच या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाचे आमदार, मंत्री नितेश राणे आणि शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे हे आमने-सामने आले होते. तसेच या निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांमुळे राणे कुटुंबांमध्ये मतभेद झाल्याची चर्चाही सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गात ‘एकच ना.रा.’ असे सूचक बॅनर लागले होते. दरम्यान, आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिंदेसेनेमध्ये विभागलेल्या राणे समर्थकांनी एकत्र येत शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी नारायण राणेंचं स्वागत करण्यासाठी नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यासोबत शिंदेसेनेचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हेसुद्धा उपस्थित होते.