सावंतवाडीतील गरीब महिलांची फसवणूक, तक्रार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 16:58 IST2020-08-12T16:56:51+5:302020-08-12T16:58:17+5:30
दर महिना ३ हजार रुपये भरा आणि एक लाख कर्ज देतो, असे आमिष दाखवून गोव्यातील एका व्यक्तीने सावंतवाडीतील २० गरीब महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत या महिलांनी सावंतवाडी शिवसेनेच्या महिला संघटक अपर्णा कोठावळे यांच्याकडे धाव घेतली.

सावंतवाडीतील गरीब महिलांची फसवणूक, तक्रार अर्ज
सावंतवाडी : दर महिना ३ हजार रुपये भरा आणि एक लाख कर्ज देतो, असे आमिष दाखवून गोव्यातील एका व्यक्तीने सावंतवाडीतील २० गरीब महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत या महिलांनी सावंतवाडी शिवसेनेच्या महिला संघटक अपर्णा कोठावळे यांच्याकडे धाव घेतली.
कोठावळे यांनी तत्काळ सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकारी स्वाती यादव यांची भेट घडवून आणत महिलांना न्याय देण्याची मागणी केली. याबाबत तक्रार अर्ज पोलिसांत देण्यात आला आहे. त्यावरून पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.
सावंतवाडी शहरात अनेक निराधार, गरीब महिला आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करतात. याच संधीचा फायदा या महिलेने उचलला. एका मोलमजुरी करणाऱ्या महिलेशी ओळख करीत तुम्हांला १ लाखापर्यंत विनाव्याज कर्ज मिळणार आहे. त्यासाठी दर महिना ३ हजार रुपये तीन वर्षे भरले पाहिजेत, असे सांगितले.
गोवा-पेडणे भागातील कवठणकर नामक व्यक्ती ही स्कीम राबवित आहे. त्यांची तुम्हांला ओळख करून देते, असे सांगितले. मोलमजुरी करणाऱ्या महिलांना मुलांच्या शिक्षणासाठी व वैद्यकीय सुविधांसाठी पैशाची गरज असल्यान शहरातील २० महिलांनी डिसेंबर २०१९ मध्ये महिना ३ हजार रुपयांचा हप्ता संबंधित महिलेकडे तर काहींनी गोव्यातून सावंतवाडीत आलेल्या कवठणकर यांच्याकडे दिला.
काहींनी त्यांनी दिलेल्या बँक खात्यात रक्कम भरणा केली. त्यावेळी त्या व्यक्तीने हप्ते भरलेल्या महिलांकडून आधारकार्ड झेरॉक्स व बँक खाते नंबर घेतला. त्यानंतर ३ महिने उलटून गेले तरी १ लाख मिळाले नाहीत. त्यामुळे महिलांना संशय आला. त्यांनी कवठणकरच्या मोबाईलवर संपर्क साधला.
त्यावेळी त्याने १ लाख कर्ज देण्यास टाळाटाळ करीत धमकी देत पैसे मिळत नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच सबंधित महिलेनेही हात वर केले. त्यामुळे पैसे भरलेल्या महिलांनी अपर्णा कोठावळे व प्रशांत कोठावळे यांच्याकडे धाव घेत माहिती दिली.