Sindhudurg: ‘ओंकार’ हत्तीचा बांदा परिसरात धुडगूस, भात शेतीचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:30 IST2025-10-07T16:29:21+5:302025-10-07T16:30:13+5:30
पंचक्रोशीत भीती, अस्वस्थता अन् रोषाचे वातावरण

छाया : अजित दळवी
बांदा: गेली आठ दिवस ‘ओंकार’ हत्तीची बांदा परिसरातील कास, सातोसे, मडुरा गावात दहशत सुरूच आहे. हत्तीने अनेक शेतकऱ्यांच्या भातशेतीत मोठे नुकसान केले आहे. पिके चिरडली, बांध फोडले आणि काही ठिकाणी भाताचं पीक सपाट केले. यामुळे पंचक्रोशीत भीती, अस्वस्थता आणि रोषाचे वातावरण आहे.
सध्या या भागात भात कापणीचा हंगाम सुरू आहे. हत्तीच्या दहशतीने शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. सोमवारी सायंकाळी ओंकारने मडुरा-सातार्डा मुख्य रस्त्यावर सुमारे तासभर ठिय्या मारल्याने वाहतूक ठप्प झाली होती. आज मंगळवारी दुपारी मडुरा गावातील परबवाडी परिसरात ओंकारचा वावर असल्याचे उपसरपच बाळु गावडे यांनी सांगितले.
गेल्या आठवड्याभरापासून हा हत्ती कास आणि सातोसे परिसरात ठाण मांडून होता. तीन दिवसांपासून कास गावातील शेतात थैमान घातल्यानंतर सोमवारी सकाळी ओंकारने मडुरा गावात प्रवेश केला. त्याच्यामुळे गावात अक्षरशः खळबळ उडाली. काही नागरिकांनी जीव धोक्यात घालून अगदी जवळ जाऊन व्हिडिओ शूट केले. ओंकारच्या आक्रमक स्वभावामुळे दुर्घटना होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले.
'ओंकार'चा रेल्वे रुळाजवळ वावर
वनविभागाचे पथक सतत गस्त घालत असून, रेल्वे विभागालाही सतर्क केले आहे. सध्या हत्ती कोकण रेल्वे रुळांच्या जवळपास ८०- १०० मीटर अंतरावर वावरत आहे, त्यामुळे ट्रॅकवर तो येऊ नये यासाठी वनकर्मी सतर्क आहेत.
हत्ती पकड मोहिमेचे आश्वासन हवेत विरले
हत्तीचा उपद्रव वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये वनविभागाबद्दल प्रचंड नाराजी आहे. “हत्ती पकड मोहिमेचे आश्वासन हवेत विरले आहे. दोन-तीन दिवसांत कारवाई करू असं सांगून आठवडाभर लोटला. नागरिक दिवसेंदिवस भीतीत जगत आहेत आणि वनविभाग केवळ कागदोपत्री काम करत आहे.
वनविभागावर आरोप
रोणापालचे माजी सरपंच सुरेश गावडे यांनीही वनविभागावर आरोप केला की, “वनविभाग केवळ तोंडी आश्वासने देतो. हत्तीच्या वावरावर नियंत्रण नाही. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेले नाहीत आणि नुकसानभरपाईही नाही. विभाग फक्त नागरिकांना चुकीची माहिती देत आहे.”
नुकसानभरपाई जाहीर करा
मडुरा, परबवाडी, कास, आणि सातोसे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हत्तीमुळे कापणी थांबली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. वनविभागाने तातडीने सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी अशी मागणी उपसरपंच बाळु गावडे यांनी केली.
‘वनतारा’चे पथक कधी येणार?
जिल्हा उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी “दोन-तीन दिवसांत हत्ती पकड मोहीम सुरू केली जाईल” असे सांगितले होते. या मोहिमेसाठी ‘वनतारा’ या खास प्रशिक्षित पथकाला बोलावण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. परंतु, मंगळवारी दुपारपर्यंत प्रत्यक्ष कारवाई झालेली नसल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये निराशा पसरली आहे. वनविभागाने सुरुवातीला हत्तीला जंगलाकडे परतविण्याचे प्रयत्न केले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.
‘ओंकार’ हत्तीच्या सततच्या हालचालींमुळे संपूर्ण बांदा-मडुरा पंचक्रोशीत भीती, अस्वस्थता आणि रोषाचे वातावरण आहे. भातशेतीचे मोठे नुकसान, वनविभागाची विलंबित प्रतिक्रिया आणि निष्क्रिय भूमिका यामुळे ग्रामस्थांचा विश्वास कमी होत चालला आहे. वनविभागाकडून हत्ती पकड मोहिमेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.