Sindhudurg: तिलारीत अज्ञाताने कार पेटवली, दोडामार्गचे नगराध्यक्ष ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:41 IST2025-09-26T13:41:04+5:302025-09-26T13:41:34+5:30
गाडीतून मांस तस्करी होत असल्याच्या कारणावरून ही आग लावल्याची चर्चा

Sindhudurg: तिलारीत अज्ञाताने कार पेटवली, दोडामार्गचे नगराध्यक्ष ताब्यात
दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) : तिलारी येथे मांस वाहतूक करणाऱ्या एका गाडीला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या गाडीतून मांस तस्करी होत असल्याच्या कारणावरून ही आग लावल्याची चर्चा होती. या प्रकरणी पोलिसांनी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कोकण परिक्षेत्र महानिरीक्षक संजय दराडे यांनी तत्काळ येथील पोलिस ठाण्याला भेट देत घटनेची माहिती घेतली. दोडामार्ग शहरासह संपूर्ण तालुक्याला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तिलारी घाट माथ्यावरून एक स्विफ्ट कार गुरुवारी दुपारी दोडामार्ग मार्गे गोव्याला जात होती. तिलारी येथे ही कार आली असता काही अज्ञातांनी त्यात मांस असल्याचा संशय व्यक्त करत ती कार थांबवली. आतमध्ये मांस दिसताच ती कार जाळली. कारमधून आगीचे मोठे लोळ बाहेर पडत होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे हे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यादेखील घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तत्काळ राज्य मार्ग दोन्ही बाजूने बंद केला.