दीपक केसरकरांना खरे दहशतवादी कोण वेळीच कळलं, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 18:36 IST2022-06-25T18:31:53+5:302022-06-25T18:36:00+5:30
मातोश्रीवरून केसरकरांची गाडी जाऊ दिली नाही. त्यामुळे दहशत निर्माण करणारे कोण? हे देखील त्यांच्या लक्षात आले असेल.

दीपक केसरकरांना खरे दहशतवादी कोण वेळीच कळलं, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा टोला
कणकवली : आमदार दीपक केसरकर सातत्याने आमच्यावर दहशतवादाचा आरोप करायचे. पण आता त्यांना शिवसेनेचा दहशतवाद समजला असेल, मातोश्रीवरून त्यांची गाडी जाऊ दिली नाही. त्यामुळे दहशत निर्माण करणारे कोण ? हे देखील त्यांच्या लक्षात आले असेल असा टोला भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींनी केसरकरांना लगावला.
तसेच केसरकर शिंदे गटात गेल्याने त्यांच्याबाबत कोकणच्या हितासाठी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिकाही तेली यांनी यावेळी मांडली. कणकवली येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तेली म्हणाले, दीपक केसरकर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. भविष्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षश्रेष्ठी केसरकर यांच्या बाबतीत जो निर्णय घेतील आणि आम्हाला ज्या सूचना देतील त्या आम्हाला मान्य असतील. शिवसेना पक्षात धोके निर्माण होऊ शकतात हे दीपक केसरकराना आता समजून आले ही आनंदाची बाब आहे. यावरून शिवसेनेचा दहशतवाद केसरकराना समजला असेल. आजवर केसरकर आमच्यावर दहशतवादाचा आरोप करत होते. पण खरे दहशतवादी कोण आहेत हे देखील त्यांना वेळीच कळले असा टोला तेली यांनी लगावला.