संतांची विभागणी करण्याचे षड्यंत्र : सदानंद मोरे

By Admin | Updated: January 11, 2015 00:25 IST2015-01-11T00:25:25+5:302015-01-11T00:25:44+5:30

शतायू ग्रंथालये व ग्रंथालय अधिवेशन कार्यक्रम

Conspiracy to divide the Saints: Sadanand More | संतांची विभागणी करण्याचे षड्यंत्र : सदानंद मोरे

संतांची विभागणी करण्याचे षड्यंत्र : सदानंद मोरे

चिपळूण : मराठी साहित्य व भाषा घडविण्यात संतांचा वाटा मोठा आहे. संत साहित्याने जीवनाचे लौकिक व अलौकिक असे भाग पाडले नाहीत. माणसाचं माणूसपण जपण्यासाठी संत साहित्य वाचणे ही काळाची गरज आहे, पण याच संतांना जातीजातीत विभागण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याची खंत ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे यांनी येथे आज, शनिवारी व्यक्त केली. रिकामटेकडे या टीकेवरही त्यांनी जाता-जाता शालजोडीतला टोला हाणला.
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूणतर्फे शतायू ग्रंथालये व ग्रंथालय अधिवेशन कार्यक्रमात संत साहित्याने केलेले समाजप्रबोधन याबाबत प्रा. मिलिंद जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद जाधव यांनी प्रा. मोरे यांचे स्वागत केले.
अध्यक्ष समर्थ असेल तर वर्षभर लोक समर्थपणे त्याच्याकडे बघतात. तो एक वैचारिक नेता असतो, असे सांगतानाच प्रा. मोरे यांनी रिकामटेकडेपणाच्या आरोपाचा समाचार घेतला. कुठलीही कला निर्माण होताना रिकामटेकडेपणा लागतो. टेकडे हा शब्द मान्य आहे, असा टोला त्यांनी भालचंद्र नेमाडे यांचे नाव न घेता हाणला.
साहित्याच्या मुख्य प्रवाहाची दखल घेण्यास वेळ लागणार आहे. ही एक प्रक्रिया असते. एखादी गोष्ट सर्वच स्वीकारतील, असे होत नाही. साहित्यिक हा वेगवेगळ्या प्रवाहांची तमा न बाळगता वागत असतो.
संत साहित्य हा मराठीचा मुख्य गाभा आहे. दैनंदिन जीवनाला माहिती देणारी पुस्तके सध्या जास्त खपतात. अशी उपयुक्त पुस्तके लिहिणे गरजेचे आहे. लोक कविता ऐकायला गर्दी करतात; परंतु पुस्तक खरेदी करत नाहीत. ऐकण व वाचन यात फरक असतो. काव्य संस्कृती वाढली पाहिजे, ती टिकली पाहिजे, असेही ते म्हणाले.
मराठी माणसाच्या आशा-आकांक्षा मोठ्या आहेत, याचा विचारही व्हायला हवा. आधुनिक साहित्यांनी व्यवहारात भर टाकली आहे. दलित साहित्यामध्ये वेगळेपणा आहे.
यंत्रमानव व मानव यांच्यात भविष्यात युद्ध होईल. यासाठी सावध राहण्याची गरज आहे. साहित्य हे मराठी माणसाला बाजूला करू शकत नाही. मराठी माणसांच्या आशा-आकांक्षा आहेत याचा विचार साहित्यात व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Conspiracy to divide the Saints: Sadanand More