सिंधुदुर्ग जिल्हा बँक मॅनेजरच्या आत्महत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल, ‘डीकी’तील चिठ्ठी ठरली निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 13:54 IST2026-02-21T13:54:04+5:302026-02-21T13:54:57+5:30

रक्कम परत न केल्याने टोकाचे पाऊल; पत्नीच्या फिर्यादीनंतर देवगड पोलिसांची कारवाई

Case registered against two in Sindhudurg district bank manager's suicide case | सिंधुदुर्ग जिल्हा बँक मॅनेजरच्या आत्महत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल, ‘डीकी’तील चिठ्ठी ठरली निर्णायक

सिंधुदुर्ग जिल्हा बँक मॅनेजरच्या आत्महत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल, ‘डीकी’तील चिठ्ठी ठरली निर्णायक

देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुणगे शाखेचे व्यवस्थापक अविनाश काशिराम तळवडेकर (रा. आरे बौद्धवाडी) यांच्या आत्महत्याप्रकरणी सुहास नारायण मालंडकर (६०, रा. देवगड) व अमोल नंदकिशोर कांदळगावकर (३५, रा. देवगड) या दोन संशयितांविरुद्ध देवगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत अविनाश यांची पत्नी सुनीता तळवडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

नोव्हेंबर २०२५ मध्ये घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. अविनाश तळवडेकर हे २५ नोव्हेंबर रोजी बँकेत जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले; मात्र ते घरी परतले नाहीत. शोधाशोध केली असता, आरे जेठेवाडी येथील एका कौल कारखान्याजवळ त्यांची मोटारसायकल सापडली आणि डिकीमध्ये त्यांनी लिहून ठेवलेली सुसाईड नोट आढळून आली. दुसऱ्या दिवशी सकाळी येथील तळ्यातील पाण्यात त्यांचा मृतदेह मिळून आला. 

संशयित सुहास मालंडकर आणि अमोल कांदळगावकर यांना अविनाश यांनी मोठी रक्कम दिली होती, मात्र ती रक्कम संशयितांनी परत न केल्याने मानसिक दडपणाखाली येऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०८, ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक भरत धुमाळ करीत आहेत.

‘डीकी’तील चिठ्ठी ठरली निर्णायक

अविनाश बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या मोटारसायकलच्या डिकीत एक चिठ्ठी सापडली होती. या चिठ्ठीत आपल्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या बाबींचा उल्लेख केल्याची शक्यता वर्तविली जात होती. याच पुराव्यांच्या आधारे आणि पत्नीच्या जबाबावरून आता या प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

आर्थिक व्यवहारातून घेतला बळी?

मृत अविनाश तळवडेकर यांनी संशयितांना मोठी रक्कम दिली होती; पण ती परत मिळत नसल्याने ते गेल्या काही काळापासून तणावाखाली होते. एका बँक व्यवस्थापकाला अशा प्रकारे आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलावे लागल्याने बँक कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title : सिंधुदुर्ग बैंक मैनेजर आत्महत्या: दो पर आरोप, नोट बना अहम सबूत

Web Summary : सिंधुदुर्ग बैंक मैनेजर अविनाश तलावेडकर की आत्महत्या के मामले में दो लोगों पर आरोप लगे। उनकी गाड़ी में मिली सुसाइड नोट से पता चला कि उन्होंने कर्ज की वजह से तनाव में आकर आत्महत्या की, जिसके बाद पुलिस ने कार्रवाई की।

Web Title : Sindhudurg Bank Manager Suicide: Two Charged, Note Key Evidence

Web Summary : Sindhudurg bank manager Avinash Talavadekar's suicide led to charges against two individuals. A suicide note found in his vehicle's trunk revealed financial pressures from unreturned loans, prompting police action based on his wife's complaint.