वैभववाडीत कोल्हापुरातील कारचालकासह चौघांना चोपले, पोलिसांसमोरच जोरदार राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:59 IST2025-06-19T15:59:36+5:302025-06-19T15:59:57+5:30

बसस्थानकासमोर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती

Car hits two wheeler in Vaibhavwadi Local youths beat up four people from Kolhapur | वैभववाडीत कोल्हापुरातील कारचालकासह चौघांना चोपले, पोलिसांसमोरच जोरदार राडा

वैभववाडीत कोल्हापुरातील कारचालकासह चौघांना चोपले, पोलिसांसमोरच जोरदार राडा

वैभववाडी : वैभववाडी बसस्थानकासमोर कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर वैभववाडीत जोरदार राडा झाला. संतप्त स्थानिक तरुणांनी पोलिसांसमोरच कारचालक आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांना चोप दिला. या प्रकारामुळे बसस्थानकासमोर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. हा प्रकार बुधवारी (दि. १८) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घडला.

रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे सध्या वाहतूक कोंडी होत असते. बुधवारी वैभववाडीचा आठवडा बाजार होता. त्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी होती. दरम्यान, कोल्हापूरमधील पाचजण एका आलिशान कारमधून कणकवलीला जात होते. वैभववाडी बसस्थानकासमोर एका नगरसेवकाच्या दुचाकीला या कारची धडक बसली. यात दुचाकीचे नुकसान झाले. त्यामुळे त्या नगरसेवकाने कारचालकाकडे विचारणा केली असता दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. कारमध्ये बसलेले तीन तरुणही त्या नगरसेवकाशी हुज्जत घालू लागले. हे पाहून नगरसेवकाचा आजूबाजूला असलेला मित्रपरिवार काही मिनिटांत तेथे जमा झाला.

कारमधील तरुणीने मागितली माफी

रस्त्याच्या मधोमध गाडी उभी असल्यामुळे आणि शेकडोंची गर्दी जमा झाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांनी ती कार बसस्थानकाच्या आवारात नेली. प्रकरण आपल्यावर उलटणार, याची कल्पना आल्याने कारमधील तरुणी ‘आमची चूक झाली. आम्ही माफी मागतो’ अशी विनवणी करत होती. परंतु, कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्याचवेळी नगरसेवकाचा मोठा मित्र परिवार तेथे आला. चर्चा सुरू असतानाच संतप्त स्थानिकांनी कारमधील चौघांना बाहेर घेत मारहाण करण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी तरुणांना बाजूला करून कारमधील सर्वांना पोलिस ठाण्यात नेले. दीड तास पोलिस स्थानकात चर्चा सुरू होती. त्यानंतर तेथे ज्येष्ठ मंडळी दाखल झाली. त्यांनी मध्यस्थी करत त्या नगरसेवकाची समजूत काढली. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

वैभववाडीत वाहतूक कोंडी

शुकनदी ते शांतीनदीपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एकाच बाजूने वाहतूक सुरू असते. दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यानंतर वाहतुकीची खूप मोठी समस्या निर्माण होते. वैभववाडी शहरात वाहतूक कोंडीमुळे अशा प्रकारांना सामोरे जावे लागत आहे.

Web Title: Car hits two wheeler in Vaibhavwadi Local youths beat up four people from Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.