वादळी वाऱ्यामुळे आश्रयासाठी नौका देवगड बंदरात दाखल, ताशी ४५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:01 IST2025-09-30T19:00:20+5:302025-09-30T19:01:04+5:30
देवगड : वादळी वाऱ्यामुळे गेल्या दोन दिवसात देवगड बंदरात मोठ्या प्रमाणावर नौका दाखल झाल्या आहेत. मुख्यत: सुरक्षेसाठी आणि मच्छीमारांना ...

वादळी वाऱ्यामुळे आश्रयासाठी नौका देवगड बंदरात दाखल, ताशी ४५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे
देवगड : वादळी वाऱ्यामुळे गेल्या दोन दिवसात देवगड बंदरात मोठ्या प्रमाणावर नौका दाखल झाल्या आहेत. मुख्यत: सुरक्षेसाठी आणि मच्छीमारांना आपला जीव वाचविण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान विभागाने २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पाऊस आणि ४५ ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे.
त्यामुळे स्थानिक आणि अन्य राज्यातील गुजरात, कर्नाटक, मुंबई, मालवण येथील शेकडो मासेमारी नौका देवगड बंदरात आश्रय घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरात वाऱ्यामुळे गुजरात राज्यातील तब्बल ८२ मासेमारी नौका ६५८ खलाशांसह सुरक्षित आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत.
देवगड हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असेलेले एक नैसर्गिक बंद आहे. हे बंदर मासेमारीसाठी महत्वाचे असून वादळी वार्यामुळे किंवा इतर धोक्याच्या परिस्थितीत नौकांना सुरक्षित आश्रय देण्याासाठी वापरले जाते. या बंदरात केवळ स्थानिक नौकाच नाही तर केरळ, तामिळनाडू आणि गुजरातच्या नौकाही अनेकदा आश्रयासाठी दाखल होत असतात.
सध्या समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन या मासेमारी नौका मोठ्या संख्येने देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. अरबी समुद्र खवळला असून जोराच्या लाटा उसळत आहेत.