तळेखोल जाळपोळ; ३७ जणांवर गुन्हे

By Admin | Updated: February 1, 2015 00:39 IST2015-02-01T00:39:25+5:302015-02-01T00:39:25+5:30

सातजणांना अटक : देवस्थानच्या मानापमानावरून घटना

Blurry; 37 cases of crime | तळेखोल जाळपोळ; ३७ जणांवर गुन्हे

तळेखोल जाळपोळ; ३७ जणांवर गुन्हे

दोडामार्ग : तळेखोल येथे देवस्थानच्या मानापमानावरून दोन गटांत गेल्या अनेक वर्षांपासूनचा असलेला वाद काल, शुक्रवारी रात्री उफाळून आला. जत्रोत्सवातच दोन्ही गटांत तुुफान हाणामारी आणि जाळपोळ झाली. त्यात बाराजण जखमी झाले, तर सात गाड्यांची मोडतोड व दोन दुचाकीही जाळण्यात आल्या. दोन्ही गटांकडून दोडामार्ग पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, दोन्हींकडील ३७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत सातजणांना अटक करण्यात आली असून, ३० जण फरार आहेत.
गोव्याच्या सरहद्दीवर असलेल्या तळेखोल गावात गेल्या अनेक वर्षांपासून देवस्थानच्या वादातून दोन गटांत वाद आहेत. हा वाद काल रात्री श्री देवी सातेरी केळबायच्या जत्रोत्सवात उफाळून आला. कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने तहसील कार्यालयात दोन्ही गटांतील मंडळींना बोलविण्यात आले होते. यावेळी तोडगा निघाला नाही. तहसीलदारांनी दळवी व गवस गटाला जत्रोत्सव साजरा करण्यास परवानगी देत सावंत व दळवी गटास त्या ठिकाणी जाण्यास मनाई आदेश केला होता. मात्र, रात्री साडेनऊच्या सुमारास लाडू दळवी व गवस गटाने देवीची आरती व पालखी काढली असता त्याच दरम्यान विरोधी सावंत गटाने मंदिरात येऊन जत्रोत्सव साजरा करण्यास दळवी व गवस गटाला विरोध केला. यावेळी दोन्ही गटांत शाब्दिक बाचाबाची होत त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. लाकडी दांड्यांनी दोन्ही गटांतील माणसांनी एकमेकांना मारहाण केली. मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या दुकानांचीही नासधूस करण्यात आली. तसेच दळवी व गवस गटाच्या सात गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. दोन दुचाक्या फोडण्यात आल्या. या घटनेची माहिती दोडामार्ग पोलीस ठाण्यात कळताच पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी आपल्या फोजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस दाखल होताच दोन्ही गटांतील दंगेखोरांनी मंदिर परिसरातून पळ काढला. जखमी झालेल्या दोन्ही गटांतील महिला व पुरुष मंडळींना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (प्रतिनिधी)
मंदिराला आगीची झळ
देवस्थानच्या वादातूनच मंदिरालाही आग लावण्याचा प्रयत्न झाला. दुचाक्यांना आग लावल्यानंतर झालेल्या स्फोटाचा भडका उडून मंदिराच्या सभागृहाला आग लागली. पोलिसांनी तत्काळ ही आग विझविल्याने मंदिराचे नुकसान झाले नाही.


 

Web Title: Blurry; 37 cases of crime