सावंतवाडीत भाजपकडून गैरसमज पसरविला जातोय, अफवांवर विश्वास ठेवू नका - दीपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 18:45 IST2025-11-25T18:44:24+5:302025-11-25T18:45:13+5:30
Local Body Election: 'काही जण मला चक्रव्यूहमध्ये अडकवू पाहात आहेत'

सावंतवाडीत भाजपकडून गैरसमज पसरविला जातोय, अफवांवर विश्वास ठेवू नका - दीपक केसरकर
सावंतवाडी : निवडणूकीत युती झाली असती तर माझ्या नावाने मते मागणे ठीक होत. पण युती झाली नाही. मग अशावेळी माझ्या नावावर मते मागून लोकांमध्ये गैरसमज का पसरवता असा सवाल राज्याचे माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केला. मला राजकीय दृष्ट्या संपविण्याचा प्रयत्न सावंतवाडीतील जनताच हाणून पाडेल असा विश्वास ही केसरकर यांनी व्यक्त केला.
मंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडीतील जाहीर सभेत केसरकर हमारे साथ ये अंदर की बात असे व्यक्तव्य केले होते. त्याला केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅड निता सावंत-कविटकर, बाबू कुडतरकर, अशोक दळवी, परिक्षीत मांजरेकर, दया परब उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, मी कुणावरही टिका केली नाही मग माझ्या आजारपणावर बोलणे योग्य नाही. कुठलाही माणूस आजारी पडू शकेल यात काही गैर नाही. मी युतीसाठी शेवटपर्यंत आग्रही होतो पण युती झाली नाही. युती झाली असती नक्कीच माझ्या नावावर मते मागणे ठिक होते. पण आता युती झाली नाही असे असताना लोकांच्या मनात गैरसमज का पसरवता असा सवाल करत सावंतवाडीतील जनतेने आता जागरूक राहिले पाहिजे. काही जण मला चक्रव्यूहमध्ये अडकवू पाहात आहेत पण हे चक्रव्यूह सावंतवाडीतील जनताच भेदेल असे ही केसरकर म्हणाले.
केसरकर यांनी सावंतवाडीतील जनता सुज्ञ असून आमचे पिढीन पिढी चे संबध आहेत.मग अशावेळी लोकांनी सावध राहिले पाहिजे लोकांसाठी कोण वेळ देतात हे बघितले पाहिजे अशा सोबत जनतेने राहावे असे आवाहन ही यावेळी केसरकर यांनी केले.
मुलगा म्हणून नक्कीच नारायण राणे आर्शीवाद देतील
खासदार नारायण राणे हे प्रचारापासून दूर आहेत असे विचारता त्यांनी यावर बोलणे टाळले. तसेच आमदार निलेश राणे यांनी राणेंचा आर्शीवाद आपणास मिळेल असे म्हणाले होते. यावर केसरकर म्हणाले कदाचित मुलगा म्हणून आर्शिवाद देतील असे ही केसरकर म्हणाले.