सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी, पर्यावरण संतुलनासाठी टास्क फोर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:48 IST2025-10-08T15:48:05+5:302025-10-08T15:48:40+5:30

मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडील जनहित याचिका आदेशाने ही बंदी घालण्यात आली आहे

Ban on tree felling in 13 villages of Sindhudurg district, task force for environmental balance | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी, पर्यावरण संतुलनासाठी टास्क फोर्स 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी, पर्यावरण संतुलनासाठी टास्क फोर्स 

सिंधुदुर्गनगरी : दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील एकूण १३ गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी घातलेली आहे, अशी माहिती सावंतवाडी, दोडामार्ग टास्क फोर्स समितीचे सदस्य सचिव वैभव बोराटे यांनी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडील जनहित याचिका आदेशाने ही बंदी घालण्यात आली आहे.

पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडील दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या भारत सरकार यांच्याकडील प्रस्तावीत अधिसूचनेमध्ये दोन्ही तालुक्यांतील एकूण २५ गावांचा इको सेन्सिटिव्ह एरियामध्ये समावेश आहे. उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडील जनहित याचिका क्र. १९८/२०१४ मध्ये दि. ५ डिसेंबर २०१८ व दि. २२ मार्च २०२४ चे आदेशान्वये अवैधरीत्या होणाऱ्या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्याकामी व पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सावंतवाडी, दोडामार्ग टास्क फोर्स समिती तयार करण्यात आलेली आहे.

या समितीमध्ये महसूल विभाग, वनविभाग व पोलिस विभागामधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष हे उपविभागीय अधिकारी सावंतवाडी असून, सदस्य सचिव सहायक वनसंरक्षक हे आहेत. त्याचबरोबर या समितीमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार सावंतवाडी, दोडामार्ग, वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी, आंबोली, दोडामार्ग व पोलिस निरीक्षक सावंतवाडी, दोडामार्ग हे सदस्य आहेत.

या समितीच्या मासिक बैठकीमध्ये उच्च न्यायालयाकडील आदेशानुसार वृक्षतोडीस प्रतिबंधित क्षेत्रामध्ये संबंधित विभागांनी वृक्षतोडीस प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने पर्यावरणीय ऱ्हास रोखण्यासाठी केलेली कार्यवाही, प्रचार-प्रसिद्धी व प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा दरमहा आढावा घेतला जातो.

सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समितीने ठरविल्याप्रमाणे, दोडामार्ग तालुक्यात कोठेही गावात खासगी मालकी शासकीय क्षेत्रात वृक्षतोड झालेली किंवा वृक्षतोड होताना निदर्शनास आल्यास घटनेबाबत जनतेने गावातील पोलिस पाटील, वनरक्षक, तलाठी यापैकी कोणालाही तातडीने कळविण्यात यावे. जेणेकरून वनविभागाकडील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी जाऊन तत्काळ चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करतील, तसेच अशा चौकशी प्रकरणांमध्ये शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर नागरिकांनी आवश्यक ते सहकार्य करण्यात यावे, अशी विनंती करण्यात येत आहे.

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अवैध वृक्षतोड प्रकरणी महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम १९६४ व महाराष्ट्र जमीन महसूल (झाडे इत्यादींच्या बाबतीतील अधिकारांचे नियमन करण्याबाबत) नियम १९६७ अन्वये कडक कारवाई करण्यात येईल.

वृक्षतोडीबाबत ऑनलाइन तक्रारीसाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समितीचा ई-मेल आयडी तयार करण्यात आलेला आहे, ई-मेल आयडी sdtfsawantwadi@ gmail.com असा आहे, या ई-मेलवर आपण वृक्षतोडीच्या घटनांबाबत तक्रार दाखल करू शकता. तसेच वृक्षतोडीच्या तक्रारीसाठी आपण वनविभाग सावंतवाडी ०२३६३-२७२००५ यांच्याकडे दूरध्वनीद्वारेही तक्रार दाखल करू शकता.

सावंतवाडी तालुक्यातील गावे

असनिये, पडवे माजगाव, भालावल, तांबोळी, सरमळे (नेवली सह), दाभिळ, ओटवणे, कोनास, घारपी, उडेली, केसरी, फणसवडे.

दोडामार्ग तालुक्यातील गावे

कुंब्रल, पणतुर्ली, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवळ, उघाडे, कळणे, भिकेकोनाळ, कुंभवडे, खडपडे, भेकुर्ली, फुकेरी.

Web Title : सिंधुदुर्ग के गांवों में पेड़ काटना प्रतिबंधित; संतुलन के लिए टास्क फोर्स

Web Summary : सिंधुदुर्ग जिले के 13 गांवों में पर्यावरण संरक्षण के लिए पेड़ काटने पर प्रतिबंध लगा दिया गया है। अवैध कटाई और पर्यावरण क्षरण को रोकने के लिए एक टास्क फोर्स का गठन किया गया है। नागरिकों से पेड़ काटने की घटनाओं की सूचना स्थानीय अधिकारियों को देने का आग्रह किया गया है।

Web Title : Tree Felling Banned in Sindhudurg Villages; Task Force for Balance

Web Summary : Tree felling is banned in 13 villages in Sindhudurg district to protect the environment. A task force has been formed to prevent illegal logging and environmental degradation. Citizens are urged to report any tree felling incidents to local authorities.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.