शिंदेसेनेसोबत युती होताच भाजपात नाराजीचा स्फोट; ४३ पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 19:11 IST2026-01-19T19:08:07+5:302026-01-19T19:11:33+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाच्या ओरोस मंडळाचे अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

शिंदेसेनेसोबत युती होताच भाजपात नाराजीचा स्फोट; ४३ पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे
ओरोस - सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भाजपा शिंदेसेना महायुतीची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर अवघ्या काही तासांत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. मात्र, या घोषणेनंतर जिल्ह्यातील भाजपमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचे पडसाद थेट राजीनामा सत्रातून उमटले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाच्या ओरोस मंडळाचे अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पदावर राहून काम करणे उचित वाटत नसल्याचे त्यांनी राजीनाम्यात नमूद केले आहे. कोणत्याही नेत्याविषयी वैयक्तिक नाराजी नसल्याचे स्पष्ट करत आपला राजीनामा त्वरित स्वीकारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. हा राजीनामा भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
आनंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर ओरोस भाजपा मंडळात खळबळ उडाली आहे. ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य लॉरेन्स मान्येकर, उदयकुमार जांभवडेकर, ओरोस मंडळ उपाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचाळकर, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख मिळून एकूण ४३ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
राजकीय समीकरणे बदलणार का?
दरम्यान, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती एकत्रितपणे निवडणुका लढवणार असल्याची घोषणा रविवारी करण्यात आली होती. मात्र, जागावाटपाच्या घोषणेनंतर लगेचच भाजपामध्ये उफाळून आलेली नाराजी आणि सलग राजीनाम्यांची मालिका आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच जिल्ह्यात याबाबत चर्चा सुरु आहे.
नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रत्येक ठिकाणी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यामुळे प्रत्येकाला मान्य असणारा निर्णय घेतला जाईल. भाजपा कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी साहजिकच आहे, परंतु सर्व कार्यकर्ते एकमेकांच्या संपर्कात असून त्यांचे समाधान करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नारायण राणेंचा शब्द अंतिम मानला जात असून, सर्व संवादात तेच निर्णय घेणार आहेत. सत्तेतील सर्व पदे आमच्याकडे आहेत. कार्यकर्त्यांना संधी मिळणार असून कोणीही वंचित राहणार नाही अशी भूमिका मंत्री नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांच्या नाराजीवर घेतली आहे.