पोलिस भासवून लुटणाऱ्याला सांगलीतून अटक, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 12:16 IST2025-08-16T12:15:57+5:302025-08-16T12:16:17+5:30
तांत्रिक विश्लेषणातून पोलिसांनी आरोपीला विश्रामबागेहून घेतले ताब्यात

पोलिस भासवून लुटणाऱ्याला सांगलीतून अटक, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी
वेंगुर्ला : पोलिस असल्याचे सांगून वेंगुर्ला आणि सावंतवाडी येथील वृद्ध नागरिकांकडून सोन्याचे किमती दागिने लुटणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगलीतून अटक केली आहे. या लुटारू आरोपीचे नाव अबुतालीब मुसा इराणी (वय ३१, राहणार इराणी वस्ती, सांगली) असून त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
४ ऑगस्ट २०२५ रोजी पोलिस असल्याचे भासवून वेंगुर्ला येथील नागरिकाची सोन्याची वस्तू लुटल्याची तक्रार वेंगुर्ला पोलिस ठाण्यात नोंद झाली होती. त्याच दिवशी सावंतवाडी पोलिस ठाण्यातही अशाच प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केला आणि तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करताना संदिग्ध आरोपी सांगली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी चार दिवस कसून तपास करून विश्रामबाग परिसरातील एका पेट्रोलपंपाजवळ फिरत असणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने चोरीचे दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीला वेंगुर्ला पोलिस ठाण्यात अटक केली गेली. न्यायालयात हजर केल्यावर त्याला १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
ही कारवाई सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या पथकात उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलिस हेडकॉन्स्टेबल अनुपकुमार खंडे, बस्त्याव डिसोझा, जॅक्सन घोंसालविस आणि पोलिस कॉन्स्टेबल अमर कांडर यांचा समावेश होता.
१८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी
- वेंगुर्ला आणि सावंतवाडीतील वृद्धांकडून पोलिस असल्याचे भासवून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या अबुतालीब मुसा इराणी याला सांगलीतून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली.
- तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीच्या मदतीने संशयिताचा मागोवा घेतल्यावर विश्रामबाग परिसरात त्याला ताब्यात घेतले गेले; त्याने चोरीची कबुली दिली.
- आरोपीला न्यायालयात हजर करून १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली, ही कारवाई सिंधुदुर्ग पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.