Sindhudurg: दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला, माहेरी आली, अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:00 IST2025-07-16T19:00:04+5:302025-07-16T19:00:31+5:30
न्हावेली येथील विहिरीत आढळला मृतदेह

Sindhudurg: दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला, माहेरी आली, अन्..
सावंतवाडी : दोन महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या मळेवाड येथील अक्षरा अक्षय नाईक (२६) या विवाहितेने आपल्या माहेरी न्हावेली येथे घराशेजारील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. तिने एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले? हे मात्र कळू शकले नाही. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून अक्षरा ही सोमवारीच माहेरी आली होती.
दरम्यान, सावंतवाडी तालुक्यात आत्महत्येच्या वाढत्या घटना या चिंतेचा विषय बनला आहे. मागील दहा दिवसात पाच जणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असून सध्या प्रबोधनाची गरज बनली आहे.
मळेवाड येथील नवविवाहितेने माहेरी न्हावेली येथे विहिरीत उडी घेऊन अक्षरा अक्षय नाईक या विवाहितेने आत्महत्या केली. ती दोन महिन्यांपूर्वीच मळेवाड येथील अक्षय नाईक यांच्याशी विवाहबद्ध झाली होती. अक्षराचे माहेरचे नाव प्रतीक्षा परब होते. अक्षरा ही सोमवारी दुपारी आपल्या माहेरी न्हावेली येथे आली होती. दरम्यान, घरातील सदस्य शेतीच्या कामासाठी बाहेर गेले असल्याने ती घरी एकटीच होती.
सायंकाळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर अक्षरा दिसली नाही, त्यामुळे त्यांनी तिचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध लागला नाही. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह घराशेजारील विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच न्हावेली पोलिस पाटील सावळाराम न्हावेलकर, उपसरपंच अक्षय पार्सेकर आणि ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण आणि उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अक्षराचा तळवडे येथे टेलरिंगचा व्यवसाय होता. विशेषतः दशावतार नाट्य कलाकारांचे दशावतारी कपडे शिवण्यात तिचा मोठा हातखंडा होता. तिचा दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. पण अवघ्या दोन महिन्यात तिने असे का टोकाचे पाऊल उचलले हे मात्र कळू शकले नाही. घटनेनंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून येथील कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन केले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करीत आहेत.