Satara: दारूच्या दुकानात किरकोळ कारणावरून वाद, मारहाणीत तरुणाचा मृत्यू; सहाजणांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:38 IST2026-01-14T16:36:26+5:302026-01-14T16:38:25+5:30
दारू पित असताना किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले

Satara: दारूच्या दुकानात किरकोळ कारणावरून वाद, मारहाणीत तरुणाचा मृत्यू; सहाजणांविरोधात गुन्हा दाखल
लोणंद : लोणंद शहरातील शास्त्री चौक नजीक जुनी भाजी मंडई परिसरात असलेल्या भंडारी यांच्या देशी दारूच्या दुकानात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून झाली. यामध्ये झालेल्या अमानुष मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज दिलीप जाधव असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवार, दि. १० रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास सुरज दिलीप जाधव (वय ३०, रा. शास्त्री चौक, लोणंद) हा आपल्या मित्रांसोबत देशी दारूच्या दुकानात दारू पित असताना किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. आरोपींनी सुरज जाधव याला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
याचवेळी आरोपी संपत भागूजी शेळके याने जाड पीव्हीसी पाइपने सुरज याच्या पाठीवर, हातावर, पायावर तसेच डोक्यावर जोरदार मारहाण केली. या मारहाणीत सुरज जाधव गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी मयताची आई सुनंदा दिलीप जाधव यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भगवान श्रीरंग शेळके, अनिरुद्ध पुरुषोत्तम चांगण, संपत भागूजी शेळके, सूर्यकांत शेळके, सचिन नाना शेळके व प्रवीण शेळके (सर्व रा. निंबोडी व लोणंद परिसर) यांच्याविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे तसेच सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. जायपत्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक तपासणी व शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, ई-साक्षची पूर्तता करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.