साताऱ्यातील शाळकरी मुलीच्या खूनप्रकरणाची महिला आयोगाकडून दखल, 'एसआयटी' नेमण्याचे दिले निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 16:30 IST2025-10-13T16:30:29+5:302025-10-13T16:30:43+5:30
पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच परिसरात शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत.

साताऱ्यातील शाळकरी मुलीच्या खूनप्रकरणाची महिला आयोगाकडून दखल, 'एसआयटी' नेमण्याचे दिले निर्देश
सातारा : सातारा तालुक्यात घडलेल्या एका १३ वर्षीय शाळकरी मुलीच्या खूनप्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली. याप्रकरणी एसआयटीची नेमणूक करावी, असे निर्देश पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना राज्य महिला आयोगाने दिले आहेत.
हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरुपाचे असून, माणुसकीला काळिमा फासणारे आहे. तसेच ही घटना अत्यंत निंदनीय आहे. अल्पवयीन मुलीची अशा प्रकारे अमानूष हत्या समाजासाठी चिंतेची बाब आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये व सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे या घटनेची आपण स्वतः तत्काळ दखल घ्यावी. तसेच विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून कसून चौकशी करावी. जलदगती न्यायालयात खटला दाखल करावा. तपासात कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये, यासाठी विशेष लक्ष द्यावे.
पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच परिसरात शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत. या प्रकरणातील तपासाची सद्यस्थिती, आरोपींवर करण्यात आलेली कायदेशीर कार्यवाही आणि पीडित कुटुंबीयांना दिलेला आधार यासंबंधीचा सविस्तर कार्यवाही अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे सादर करावा, असेही निर्देशात म्हटले आहे.