घडतंय बिघडतंय : 'कृष्णा'ची निवडणूक दुरंगी की तिरंगी? डॉ. इंद्रजीत मोहितेंची तलवार 'म्यान'? अविनाश मोहितेंची पत्नीच्या हाती 'कमान'!

By प्रमोद सुकरे | Updated: May 8, 2026 12:42 IST2026-05-08T12:41:57+5:302026-05-08T12:42:17+5:30

पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारीत कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. दिवंगत यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले या २ भावांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत या कारखान्याच्या उभारणीसाठी अथक परिश्रम घेतले.

What is happening : Is the election of 'Krishna' a double-edged sword or a tricolor? Dr. Indrajit Mohite's sword 'sheath'? Avinash Mohite's 'bow' in the hands of his wife! | घडतंय बिघडतंय : 'कृष्णा'ची निवडणूक दुरंगी की तिरंगी? डॉ. इंद्रजीत मोहितेंची तलवार 'म्यान'? अविनाश मोहितेंची पत्नीच्या हाती 'कमान'!

घडतंय बिघडतंय : 'कृष्णा'ची निवडणूक दुरंगी की तिरंगी? डॉ. इंद्रजीत मोहितेंची तलवार 'म्यान'? अविनाश मोहितेंची पत्नीच्या हाती 'कमान'!

- प्रमोद सुकरे

लोकमत न्यूज नेटवर्क
कराड : रेठरे बुद्रुक (ता.कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नजीकच्या काही दिवसांत होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या जोर बैठका वाढल्या आहेत.पण यंदाची ही निवडणूक नक्की दुरंगी की तिरंगी होणार? याबाबत कार्यक्षेत्रातील सभासदांच्यात संभ्रम आहे.सत्ताधारी डॉ.सुरेश भोसले यांनी जनसंपर्कात आघाडी घेतली आहे. तर त्यांच्या विरोधातील रयत पॅनेलचे नेते व माजी अध्यक्ष डॉ.इंद्रजीत मोहिते यांची भूमिका पाहता त्यानी तलवार 'म्यान' केल्याचे बोलले जात आहे. संस्थापक पॅनेलचे नेते,माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्याही सभासदांच्या गाठीभेटी सुरू आहेत.पण त्यांची पत्नी अर्चना मोहिते यांच्या हाती सगळी कमान दिली आहे.त्यामुळे या पॅनेलमध्ये किती व कशी जान येणार? हे पहावे लागणार आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारीत कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. दिवंगत यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले या २ भावांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत या कारखान्याच्या उभारणीसाठी अथक परिश्रम घेतले. पण सन १०८९ साली या दोन भावांच्यात वैचारिक मतभेद झाले आणि पुढील अनेक वर्षे कृष्णेचा सत्ता संघर्ष अवघ्या महाराष्ट्राने पाहिला.तोच संघर्ष त्यांच्या पुढच्या पिढीने गत निवडणुकीत पर्यंत चालू ठेवल्याचे दिसून आले.त्यामुळे यंदा काय होणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

मध्यंतरी याच कारखान्याच्या संस्थापक संचालक मंडळातील दिवंगत आबासाहेब मोहिते यांचे नातू अविनाश मोहिते यांनी मोहिते- भोसलेंच्या मनोमिलनाला विरोध करत कृष्णेच्या निवडणुकीत शड्डू ठोकला अन ऐतिहासिक सत्तांतर करून दाखवले. पण ५ वर्षानंतर त्यात सातत्य ठेवण्यामध्ये त्यांना यश आले नाही. यंदा देखील या निवडणुकीसाठी त्यांची चाचपणी सुरू आहे.पण त्यात त्यांना किती यश येणार? हे पहाण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

गत निवडणूक झाली होती तिरंगी 

गत निवडणुकीत तर डॉ.सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार, डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली रयत तर अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेल अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. पण पुन्हा एकदा डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वावरच सभासदांनी भरघोस मतांचा वर्षाव करीत विश्वास दाखवला. आता पुन्हा एकदा कृष्णाची निवडणूक  होवू घातली आहे. पण या निवडणुकीत पॅनेल किती असतील? याबाबत सध्या तरी उलट सुलट चर्चा सुरू आहेत. 

इंद्रजीत मोहितेंनी साधला संवाद 

कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष, रयत पॅनेलचे प्रमुख, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ.इंद्रजीत मोहिते यांनी २ दिवसापूर्वी आपल्या गावी कार्यक्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली.या बैठकीत त्यांनी त्यांची मते जाणून घेतली. डॉ.सुधीर जगताप, राजेंद्र चव्हाण, सुभाष पाटील (येरवळेकर), उदय पाटील (आबा) यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. यावेळी इंद्रजीत मोहिते यांनी देखील कोणता पर्याय चांगला आहे याचे कार्यकर्त्यांना संकेत दिले आहेत. यावरून ते स्वतः या निवडणुकीत पॅनेल उतरवणार नाहीत असे दिसत आहे. पण ते कोणाच्या पाठीशी राहणार? याबाबत त्यांच्या समर्थकांच्यात उत्सुकता आहे .

Web Title: What is happening : Is the election of 'Krishna' a double-edged sword or a tricolor? Dr. Indrajit Mohite's sword 'sheath'? Avinash Mohite's 'bow' in the hands of his wife!